मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही तलाव ओव्हरफ्लो, राज्यातील धरणांची स्थिती काय ?
Maharashtra : मागील दोन दिवसांपासून राज्यात कोसळधारा सुरु आहेत. पण या पावसानं राज्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ अद्याप झाली नसल्याचे आकडेवारीनुसार दिसतेय.
मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यात कोसळधारा सुरु आहेत. पण या पावसानं राज्यातील धरणसाठ्यात मोठी वाढ अद्याप झाली नसल्याचे आकडेवारीनुसार दिसतेय. सध्या राज्यातील एकूण धरणांमध्ये 66.07 टक्के जलसाठा आहे. मागील 24 तासांत धरणातील जलसाठ्यात फक्त 0.77 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याचवेळी राज्यातील धरणांमध्ये 85.71 टक्के जलसाठा होता. मुंबईला पाणीपुरवठा करणारी चार धरणे फुल्ल झाली आहेत.
उजनी धरणात 18.28 टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणात पाण्याची आवक होत असल्याने ह्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र मागच्या वर्षी 100 टक्के उजनी भरल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते,मात्र यंदा त्याचे नियोजन सिंचन विभागाला करावे लागणार आहे. जायकवाडीत 32.55 टक्के जलसाठा आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरीत होत असल्याने जायकवाडीत देखील आवक अपेक्षित त्यामुळे यात देखील वाढ होणार आहे. मात्र, मागच्या वर्षी याचवेळी 98 टक्के धरण भरलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. यंदा मात्र पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील संभाजीनगर शहरांसोबतच अनेक गावं पाण्यासाठी विसंबून आहेत. कोकणात यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा जलसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये 92.25 टक्के जलसाठा, मागच्या वर्षी याचवेळी 88.81 टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागात मागील २४ तासात धरणांमध्ये ३ टक्के जलसाठा वाढला होता. नाशकातील धरणांमध्ये 65.16 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये 79.10 टक्के जलसाठा तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 72.28 टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात मागच्या वर्षी याचवेळी ९५.०३ टक्के पाणीसाठा होता, आज कोयना धरणात 80.68 टक्के जलसाठा आहे.
मुंबईतील धरणाची स्थिती -
मुंबईतील सातही तलावात 96.20 टक्के जलसाठा आहे. मुंबईतील चार तलाव शंभर टक्के भरली आहेत. तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालेत. तानसा आणि मोडकसागर मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्यावर्षी याचवेळी मुंबईतील सातही तलावात 98.17 टक्के जलसाठा शिल्लक होता.
अप्पर वैतरणामध्ये 87.13 टक्के पाणीसाठा
मोडकसागर आणि तानसा 100 टक्के जलसाठा
मध्य वैतरणा 97.61 टक्के जलसाठा
भातसा 97.05 टक्के पाणीसाठा
विहार आणि तुलसी शंभर टक्के जलसाठा
पालघर जिल्ह्यातील सर्व धरण फुल्ल, जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा
तब्बल एक महीन्याच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. पावसाच्या पुनरागमनाने संकटात सापडलेल्या शेतीला जीवनदान मिळाले असून प्रमुख धरणांमध्ये एकूण 400 दलघमी इतका मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने वर्षभर पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न देखील सुटला आहे.
पालघर जिल्ह्यात सूर्या मोठा प्रकल्प अंतर्गत धामणी आणि कवडास उन्नेयी बंधारा ही दोन प्रमुख धरणे आहेत. या धरणांमधून डहाणू नगरपरीषद, तारापूर अणूऊर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक वसाहत, पालघर नगरपरीषद यासोबतच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात डहाणू आणि पालघर तालुक्यातील जवळपास 12 हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी देखील दिले जाते. त्याचबरोबर जिल्ह्यातील वांद्री मध्यम प्रकल्प, कुर्झे, मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, मोहखुर्द, डोमहिरा आणि वाघ या लघू पाटबंधारे योजनांमधून आजूबाजूच्या गावांमधील पाणीपुरवठा योजना आणि शेतीला सिंचनासाठी पाणी सोडले जाते॰
या वर्षी नैऋत्त मान्सूनचे उशीरा आगमन झाल्याने जून महीन्यात फक्त ५५७.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै महीन्यात पावसाने सर्व कसर भरून काढत तब्बल १५०१.६ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद केली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे काठोकाठ भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महीन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पावसाअभावी जमीनीला भेगा पडायला लागून भात पिकांसह वरी, नागली सारखी पिके सुकू लागली होती. आणखी आठ-दहा दिवस पावसाने दडी मारली असती तर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असती. मात्र ऐन वेळेत पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.