(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato Flu : सावधान! कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता 'टोमॅटो फ्लू' चा वाढतोय धोका; 'अशी' घ्या काळजी
Tomato Flu In India : केरळमध्ये आतापर्यंत 82 मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झाली आहे. ही मुले 5 वर्षाखालील आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
Tomato Flu In India : कोरोना (Covid-19) आणि मंकीपॉक्सनंतर (Monkeypox) आता भारतात टोमॅटो फ्लूचा उद्रेक वाढताना दिसतोय. भारतात थैमान घालणाऱ्या 'टोमॅटो फ्लू' (Tomato Flu) या नवीन आजाराबाबत डॉक्टरांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. केरळ (Kerala) आणि ओडिशामध्ये (Odisha) या आजाराची अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. 6 मे रोजी केरळमधील कोल्लममध्ये 'टोमॅटो फ्लू'ची पहिली प्रकरणे नोंदवली गेली. लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत 82 मुलांना याची लागण झाली आहे. ही मुले 5 वर्षाखालील आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
या आजारात शरीरावर लाल ठिपके दिसू लागतात आणि मोठे दाणेही दिसतात. अशीच काही लक्षणे कोरोना, डेंग्यू, मंकीपॉक्स यांसारख्या संसर्गामध्येही दिसून येतात. असे म्हटले जात आहे की, हा संसर्गजन्य रोग आतड्यांतील विषाणूमुळे होतो आणि क्वचितच प्रौढांवर हल्ला करतो. कारण या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. या संसर्गाला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे याचे कारण या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर लाल रंगाचे फोड दिसतात. आणि हळूहळू हे पोड टोमॅटोसारखे मोठे होतात.
टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत?
अहवालात असे सांगण्यात आले आहे की, या आजारात त्वचेवर लाल ठिपके दिसू लागतात आणि मोठे पुरळही दिसू लागते. अशीच लक्षणे कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू आणि मंकीपॉक्सच्या संसर्गामध्येही दिसून येत आहेत. लाल फोडांमुळे त्याला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे. टोमॅटो फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो एका मुलापासून दुसऱ्या मुलामध्ये पसरू शकतो. इतर लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खूप ताप येणे, शरीरात पेटके येणे, सांधे सुजणे, निर्जलीकरण आणि थकवा यांचा समावेश होतो.
पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना बाधा :
टोमॅटो फ्लू हा आजार आतापर्यंत पाच वर्षांखालील मुलांना जास्त झाला आहे. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर जळजळ आणि खाज सुटते. याशिवाय या आजाराची लागण झाल्यावर रुग्णालाही खूप ताप येतो. टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांना निर्जलीकरणाच्या समस्येसह शरीर आणि सांधेदुखीचा त्रास होतो.
अशी घ्या काळजी :
टोमॅटो फ्लू या आजारापासून जर दूर राहायचे असेल तर त्यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यामध्ये मुलाला खाज सुटणार नाही, तसेच मुलांना स्वच्छ ठेवणे, त्यांना नीट विश्रांती देणे तसेच वेळोवेळी पाणी देत राहणे यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. संबंधित लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : ब्रेन डेडची स्थिती म्हणजे काय? ब्रेन डेडमध्ये मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Health Tips : हृदय आणि यकृतासाठी फायदेशीर मनुक्याचं पाणी, कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, वाचा फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )