India Independence Day 2023 : संपूर्ण देश साजरा करणार स्वातंत्र्याचा उत्सव, नव्या संसद भवनासाठी काम केलेल्या कामगारांचा पंतप्रधान मोदी करणार सन्मान
India Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक यांसह 12 ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवण्यात आले आहेत.
India Independence Day 2023 : नवं संसद भवन उभारण्यासाठी ज्या कामगरांनी मेहनत घेतली त्या कामगारांसह 1800 विशेष अतिथींचा सन्मान स्वातंत्र्यदिनाच्या (Independance Day) दिवशी लाल किल्ल्यावरील (Red Fort) करण्यात येणार आहे. तसेच, या पाहुण्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमसाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमधील 12 ठिकाणी शासनाच्या अनेक योजनांशी संबंधित सेल्फी पॉईंट्स देखील प्रशासनाकडून बनवण्यात आले आहेत.
1800 विशेष पाहुणे राहणार उपस्थित
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रांशी संबंधित 1800 लोकांना विशेष पाहुणे म्हणून त्यांच्या कुटुंबियांसह निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच नवं संसद भवन उभारण्यासाठी ज्या कामगरांनी मेहनत घेतली त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरकारने मोठ्या संख्येने विशेष पाहुण्यांना निमंत्रित केले आहे.
दरवर्षी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमांमध्ये देशांतील विविध भागातून आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी काही विशेष लोकांना आमंत्रित केलं जातं. यंदा देखील राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण 75 लोकांना त्यांच्या पारंपारिक वेषात लाल किल्ल्यावरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
नव्या संसद भवनासाठी काम करणाऱ्या कामगारांना निमंत्रण
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आलेल्या विशेष अतिथींमध्ये नव्या संसद भवनासह सेंट्रल विस्टा या प्रकल्पासाठी ज्या कामगारांनी मेहनत घेतली त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था योजनेशी संबंधित 250 लोक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास यामधील प्रत्येकी 50 लाभार्थ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
याशिवाय खादी कामगार, सीमेवर असलेल्या रस्त्यांचे बांधकाम करणारे कामगार, अमृत सरोवर आणि हर घर जल योजनेशी संबंधित लोक, तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार यांचा देखील सहभाग असणार आहे. यातील काही प्रतिष्ठित पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. तसेच ते दिल्लीमधील संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची देखील भेट घेणार आहेत.
ध्वजारोहणासाठी पंतप्रधानांना दोन महिला अधिकारी मदत करणार
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन महिला अधिकारी मदत करणार आहेत. मेजर निकिता नायर आणि मोजर जास्मीन कौर या महिला अधिकारी यावेळी पंतप्रधानांना ध्वजारोहण करण्यास मदत करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.