Maharashtra CM Oath Ceremony : ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला, महायुतीला राज्यात 237 जागांवर यश मिळत स्पष्ट बहुमत मिळालं

मुंबई : महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद व गोपनियतेची शपथ घेत स्वत:च्या नावावर वेगळा विक्रम रचला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.
विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला, महायुतीला राज्यात 237 जागांवर यश मिळत स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामध्ये, 132 जागांसह भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे, भाजप नेताच मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेन्स होता. अखेर एकनाथ शिंदे यांचीही नाराजी दूर झाली असून त्यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली, तेव्हाच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा चेहरा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, गावागावात, मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर, नियोजित वेळ आणि तारखेनुसार आज शपथविधीचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून एक बूथ कार्यकर्ता ते राज्याचे प्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. नागपूरच्या विधानसभा मतदारसंघातून एक नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. त्यानंतर, 1999 मध्ये ते सर्वप्रथम आमदार बनून विधानसभेत पाऊल ठेवलं, ते पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. गेल्या 5 टर्म म्हणजे 25 वर्षांपासून ते विधानसभेचे सदस्य असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे, त्यांच्या कर्तृत्वाची आणि अनुभवाची उंची मोठी आहे.
























