CM Of Gujarat : 12 डिसेंबरला भूपेंद्र पटेल 20 कॅबिनेट मंत्र्यांसह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री उपस्थित राहणार
12 डिसेंबरला भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबत 20 आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
CM Of Gujarat : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत (Gujarat Election) भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने (BJP) सर्व जुने विक्रम मोडून 182 जागांपैकी तब्बल 157 जागांवर विजय मिळवला आहे. आता सातव्यांदा भाजप गुजरातमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, 12 डिसेंबरला भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबत 20 आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit shah) हे उपस्थित राहणार आहेत.
गुजरातमध्ये मतांच्या टक्केवारीचेही सर्व जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल 53 टक्के मतं मिळवली आहेत. 157 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर राजकीय विश्लेषकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तसेच काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 16 जागा तर आम आदमी पक्षाला केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला आहे.
भूपेंद्र पटेलांचा राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द, आज सरकार स्थापनेचा दावा करणार
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी शुक्रवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, हर्ष सांघवी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हृषिकेश पटेल आणि गुजरातचे चीफ व्हिप पंकज देसाई राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. गांधीनगर येथील प्रदेश भाजप कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यानंतर सर्व नेते दुपारी दोन वाजता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.
भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
12 डिसेंबरला भूपेंद्र पटेल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, त्याच दिवशी 20 कॅबिनेट मंत्रीही शपथ घेऊ शकतात. दुसऱ्याच दिवशीपासून ते आपापल्या कार्यालयात पदभार स्वीकारतील.
भूपेंद्र पटेल यांचा मोठ्या फरकाने विजय
भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. 1960 नंतर 157 या कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या सर्वाधिक जागा आहेत. यावेळी गुजरातमध्ये भाजपने अनेक नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये भूपेंद्र पटेल यांनी घाटलोडिया मतदारसंघातून 1 लाख 92 हजार मतांनी विजय मिळवला आहे. हा विक्रमी मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे.
काँग्रेसला केवळ 16 जागा
गेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करत 77 जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला केवळ 16 जागांवर यश मिळवता आलं आहे. सन 1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 149 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसचा हा विक्रम यंदा भाजपने मोडीत काढला आहे. यंदाच्या निकालानंतर काँग्रेसला राज्यातील विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: