(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रविंद्र बिष्णोईला Global Student Prize नामांकन; टॉप 10 यादीत झळकणारा आणि दोन पेटंट नावावर असलेला रविंद्र बिष्णोई कोण?
Ravinder Bishnoi : ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रविंद्र बिष्णोई पहिल्या 10 जणांच्या यादीत आहे.
मुंबई : ग्लोबल टीचर अवॉर्डच्या धर्तीवर आता ग्लोबल स्टुडंट प्राईज (Global Student Prize 2023) सुरू करण्यात आला असून त्यासाठी नामांकन मिळालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांच्या यादीत राजस्थानमधील रविंद्र बिष्णोई (Ravinder Bishnoi) याला स्थान मिळालं आहे. ग्लोबल स्टुडंट प्राईजसाठी जगभरातून एकूण 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पहिल्या दहामध्ये रविंद्र बिष्णोईने स्थान मिळवलं आहे. रविंद्रने KieKie प्रायव्हेट लिमिटेड हे स्टार्टअप सुरू केलं असून त्या माध्यमातून त्याने दोन पेटंट मिळवले आहेत.
युनेस्को आणि लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला होता. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते. आता त्याच धर्तीवर ग्लोबल स्टुडंट अवॉर्ड सुरू करण्यात आला असून राजस्थानच्या रविंद्र बिष्णोई याचे त्यासाठी नामांकन मिळालं आहे.
Ravinder Bishnoi : कोण आहे रविंद्र बिष्णोई?
रविंद्र बिष्णोई हा राजस्थानमधील लहानशा खेड्यामध्ये जन्मला. तो ज्या गावात जन्मला त्या ठिकाणी शिक्षणाच्या मूलभूत सोई सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच त्या गावामध्ये रोगराईचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर होता. एअर फोर्स स्कूलमध्ये ( Air Force School) सातवीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर रविंद्रच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. त्या ठिकाणी रविंद्रने भारतीय लष्करासाठी सर्व प्रकारच्या प्रदेशामध्ये निरीक्षण करू शकेल असा रोबोट बनवला. या कामामुळे रविंद्र बिष्णोई चांगलाच चर्चेत आला.
रविंद्रने समाजाला उपयोगी ठरेल असे आविष्कार करत राहण्याचा निर्धार केला आणि गेल्या दशकभरात त्याने व्हेईकल हॉर्न कंट्रोल असेंब्ली, जे अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करते, त्याची निर्मिती केली. तसेच इतरही अनेक वाहतूक-आधारित उपकरणे तयार केली. दुचाकीचा साइड स्टँड मागे घेण्यास विसरल्यानंतर ज्या समस्येला तोंड द्यावं लागतं किंवा अपघात होऊ शकतो ते थांबवण्यासाठी त्यांने Retraction of Side Stand ची निर्मिती केली.
या दोन्ही शोधाचे त्याला पेटंट मिळालं आहे आणि त्याच्या यशस्वीरित्या प्रायोगिक चाचण्या पार पडल्या आहेत. ते लवकरच रविंद्रच्या स्टार्टअप, KieKie प्रायव्हेट लिमिटेड द्वारे बाजारात उपलब्ध होतील. 2022 मध्ये देशातील काही यशस्वी आणि लक्षणिय स्टार्टअप्सपैकी एक म्हणून भारत सरकारच्या वतीने त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रविंद्रने अलीकडेच अॅम्ब्युलन्स अॅलर्ट सिस्टीमसाठी पेटंट दाखल केले आहे. रहदारीच्या ठिकाणी त्या माध्यमातून रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार येऊ शकेल. विजेशिवाय चालणारे जगातील पहिले हेवी मेटल वॉटर फिल्टरही त्याने विकसित केले आहे. रविंद्र त्याच्या कॉलेजमध्ये आयोजित विविध ऑफलाइन आणि ऑनलाइन कार्यक्रमांद्वारे आपले ज्ञान आणि अनुभव शेअर करतो.
रविंद्रचे हे काम लक्षात घेऊन त्याला अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फोरमचा प्रॉलिफिक इन्व्हेंटर अवॉर्डचा विजेता आहे. तो अटल न्यू इंडिया चॅलेंज 2.0 चा विजेता आणि जेके लक्ष्मीपथ युनिव्हर्सिटी इनोव्हेशन चॅलेंजमध्ये उपविजेता ठरला आहे. जर ग्लोबल स्टुडंट प्राईज 2023 जिंकले तर रविंद्र त्याच्या पुढील शोधांसाठी पेटंट घेण्यासाठी, त्याच्या स्टार्टअपसाठी आणि पशुवैद्यकीय मदतसाठी मिळालेल्या निधीचा वापर करणार आहे.
ही बातमी वाचा: