Munawwar Rana Health: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती गंभीर, लखनौमधील रुग्णालयात उपचार सुरु
Munawwar Rana Health: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृति गंभीर असून लखनौमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच्या त्यांच्यसाठी पुढील 72 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Munawwar Rana Health: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांची प्रकृती गंभीर आहे. पुढील 72 तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांची मुलगी सुमैया राणा यांनी मुनव्वर राणा यांच्या प्रकृतिविषयी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी त्यांना अपोलो रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. सुमैया यांच्या माहितीनुसार, त्यांना अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
मुनव्वर यांना कर्करोगानं (Cancer) ग्रासलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात त्यांना डायलिसिस करता नेण्यात आलं, ते सध्या पित्ताशयाच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त आहेत. गेल्या मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या लखनौमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच राणा यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून फारशी चांगली नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना किडनीचा त्रास होत असल्यानं याआधीही त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोण आहेत मुनव्वर राणा?
मुनव्वर राणा हे प्रसिद्ध उर्दू कवी असून त्यांच्या गझलनी भारतीय साहित्यात त्यांनी मोलाचं स्थान निर्माण केलं आहे. तसेच त्यांनी उर्दू साहित्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा दिला आहे. त्यांच्या गझल, शायरी या लोकांच्या आजही पसंतीस पडतात. त्यांना 2014 साली उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु, देशातील असहिष्णुतेचं वातावरण पाहून त्यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र राणा यांनी सरकारकडून कोणत्याही प्रकारचा सन्मान न स्विकारण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या साहित्याच्या आवडीशिवाय राणा हे उत्तर प्रदेशात राजकारणात देखील चांगले सक्रिय आहेत. त्यांच्या कन्या सुमैया या समाजवादी पक्षात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा देखील राजकारणात सक्रिय सहभाग असल्याचं चित्र पहायला मिळतं. राणा हे त्यांच्या राजकिय वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असल्याचं पहायला मिळतं. त्यांची काही गोष्टींवरील मतं ही नेहमी वादग्रस्त ठरतात. तसेच त्यांनी पॅरिसमधील शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्याकांडाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तसेच त्यांना तालिबानला केलेल समर्थन यामुळे देखील त्यांना टीकेला चांगलेच सामोरं जावं लागलं होतं.