(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tauktae Cyclone : तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा; केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत.
मुंबई : रविवारी केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात तडाखा बसल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ उत्तरेकडे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. वाटेत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही याचा परिणाम जाणवणार आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यायासह जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या. चक्रीवादळामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळ तोक्ते येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा दरम्यान किनाऱ्ययावर येण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. गुजरातमधील सखल भागातील सुमारे सव्वा लाख लोकांना हलवण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) ची 54 पथके तैनात करण्यात आली आहेत.
हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, चक्रीवादळ तोक्तेमुळे 17 मे रोजी मुंबईसह, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड, उडुपी, चिकमगलूर आणि शिवमोगा जिल्ह्यात चक्रीवादळासंबंधीच्या घटनेमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळात मुसळधार पाऊस
चक्रीवादळ केरळच्या किनारपट्टीवरुन गेलं, त्यानंतर झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये रविवारी पाण्याच्या पातळीत वाढ दिसून आली. आयएमडीने रविवारी एर्नाकुलम, इडुक्की आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज होता. मध्य केरळमधील जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला आहे. चलकुडी नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच इडुक्की जिल्ह्यातील मालंकारा धरणाचे दरवाजे रविवारी पाण्याची पातळी वाढल्यानंतर उघडण्यात येतील. किनारपट्टी व सखल भागात राहणाऱ्या शेकडो कुटुंबातील लोकांना मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार समुद्राच्या अशांततेमुळे कमीतकमी नऊ जिल्हे बाधित आहेत.
गोव्यात मुसळधार पाऊस
दुसरीकडे रविवारी सकाळपासूनच जोरदार वार्यासह गोव्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात चक्रीवादळाशी संबंधित घटनांमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला. चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव उत्तर गोवा जिल्ह्यातील बर्डेज तालुक्यात आणि दक्षिण गोव्यातील मडगाव येथे झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोव्यात जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले, त्यामुळे राज्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. शेकडो घरांचं नुकसान झालं आहे. झाडे कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन पथकांनी लवकरच हे मार्ग मोकळे केले.
कर्नाटकातही चक्रीवादळाचा परिणाम
कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड, कोडगु, शिवमोगा, चिकमंगलुरू आणि हासन जिल्ह्यातील 73 गावे व 17 तालुके प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत 318 लोकांना सुखरुप वाचविण्यात आले असून 11 मदत शिबिरांमध्ये 298 लोकांना ठेवण्यात आले आहे. 112 घरे, 139 खांब, 22 ट्रान्सफॉर्मर, चार हेक्टरवरील फळबाग असं नुकसान झालं आहे.
मुंबई, गुजरातमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण स्थगित
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले की, तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे आणि 18 मे रोजी संपूर्ण गुजरातमध्ये कोरोना लसीकरण बंद राहिल. 17 मे आणि 18 मे दरम्यान नागरिकांनी घराबाहेर न जाण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.