Assam Flood: आसाममधील काही भागांत पूरस्थिती कायम, 583 गावं अजूनही पाण्याखालीच; 1.22 लाख लोकांना फटका
Assam News: आसाममधील 7 जिल्ह्यांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. यात जवळपास 1.22 लाख लोक अजूनही पुराशी झुंज देत आहेत.
Assam Flood: आसाममध्ये आलेल्या पुरामुळे (Flood) मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) ने रविवारी (3 सप्टेंबर) आपल्या अधिकृत माहितीत सांगितल्याप्रमाणे, आसाममधील (Assam) परिस्थिती सुधारली आहे. मात्र, सात जिल्ह्यांतील 1.22 लाखांहून अधिक लोक अजूनही पुराचा सामना करत आहेत. यामध्ये बारपेटा, चिरांग, दररंग, गोलाघाट, कामरूप महानगर, मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाममधील दररंग हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील 60 हजार 600 हून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यानंतर गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचवेळी, शनिवारपर्यंत (2 सप्टेंबर) 13 जिल्ह्यांतील सुमारे 2.43 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. रविवारी आसाममधील पुरामुळे (Assam Flood) मृत्यू झाल्याची बातमी नाही, त्यामुळे मृतांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.
आसाममधील 583 गावं पाण्याखाली
राज्य प्रशासन तीन जिल्ह्यांमध्ये 7 मदत शिबिर चालवत आहे, जिथे 1 हजार 331 लोक आश्रयाला आहेत. याशिवाय चार जिल्ह्यांमध्ये 17 मदत वितरण केंद्रही चालवली जात आहेत. एएसडीएमएने सांगितल्याप्रमाणे, सध्या आसाममधील 583 गाव पाण्याखाली आहेत आणि राज्यभरातील 8,592.05 हेक्टर पीक क्षेत्र नष्ट झालं आहे. आसाममधील 97 हजार 400 हून अधिक पाळीव प्राणी आणि कोंबड्या पुरामुळे बाधित झाल्या आहेत.
धुबरीमध्ये ब्रह्मपुत्रा धोक्याच्या चिन्हावर
बोंगाईगाव, धुबरी आणि तिनसुकिया येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दररंग आणि मोरीगावमध्ये पुराच्या पाण्यामुळे रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुत्रा नदी धुबरीमध्ये धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे.
आसाममध्ये पुरामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू
आत्तापर्यंत आसाममध्ये पुरामुळे एकूण 18 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) ASDMA च्या अधिकृत अहवालात, राज्यातील पूरग्रस्तांची संख्या अडीच लाखांवर आली असून आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
केरळमध्ये मात्र पावसाची मोठी तूट
हवामान विभागाने देशात आत्तापर्यंत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. यंदा देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये (Kerala) यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळाली आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पाऊस कमी पडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :