एक्स्प्लोर
Advertisement
ग्रामदेवता : रायगडच्या खोपोलीचं ग्रामदैवत 'बोंबल्या विठोबा'
रायगड : रायगड जिल्ह्यातल्या खोपोली तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे 'बोंबल्या विठोबा'. खोपोली-पेण मार्गावर साजगाव जवळच्या डोंगरावर विठोबा-रुक्मिणीचं मंदिर आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी ताकई गावच्या या डोंगरावर जंगल होतं. मोगलांच्या काळात घाट माथ्यावरील अनेक व्यापारी हे मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडच्या मध्यवर्ती असलेल्या खोपोली येथील बाजारपेठेत व्यापारासाठी येत असत.
यावेळेस मिरचीच्या व्यापारासाठी येणारे संत तुकाराम हे ताकईच्या डोंगरावरील जंगलातील वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. व्यापारासाठी आलेल्या तुकाराम महाराजांचे अनेकांनी पैसे बुडविल्याने त्यांनी विठूरायाचा धावा करीत बोंब मारली तेव्हापासून या मंदिरातल्या विठ्ठलाचं नाव बोंबल्या विठोबा पडलं.
मंदिराच्या स्थापनेसंदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. मोगलांच्या काळात गावातल्या एका गावकऱ्याला स्वप्नात विठोबांची मूर्ती दिसली. ही मूर्ती जंगलात असल्याचं त्याला दिसलं. हे जंगल ताकई टेकडीचं असल्याचं त्याला वाटल्यानं दुसऱ्या दिवशी त्याने ताकईच्या टेकडीवरच्या जंगलाकडे धाव घेतली. या टेकडीवर एका ठिकाणी जमिनीतून उदबत्तीचा धूर येत असल्याचं दिसल्यानं त्याने त्या ठिकाणी खणून पाहिलं. याठिकाणी त्याला विठूरायाची एक भग्नावस्थेतील पाषाण मूर्ती आढळून आली. श्रद्धाळू गावकऱ्यांनी नंतर या ठिकाणी दगडी चिऱ्याचं छोटं मंदिर उभारलं.
लोकांची श्रद्धा वाढत गेली, त्यावेळी लोकांनी मोठं लाकडी उभारलं. पण1992 साली पुन्हा एकदा जिर्णोद्धार करुन सुमारे 5000 स्क्वेअर फुटांचं आरसीसीचं प्रशस्त मंदिर बांधण्यात आलं. यामध्ये विठूराया आणि रुक्मिणीची काळ्या संगमरवराची सुबक आणि सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विठ्लाच्या मंदिरातील मूर्ती जयपूर राजस्थान येथून आणण्यात आली आहे. श्रावणातील शुद्ध प्रतिपदा ते कालाष्टमी दरम्यान देवस्थान आणि वारकरी संप्रदाय यांच्यावतीने सुमारे 22 दिवसांचा उत्सव साजरा करण्यात येतो.
विठूरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली. भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा सदुपयोग करुन येथे किमान सहा महिने अन्नदान केलं जातं. कार्तिकी एकादशीपासून सुमारे 15 दिवस यात्रा भरते. तालुक्यातून दिंड्या विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. यावेळी भजन आणि किर्तनाचे कार्यक्रम होतात. डोंगरावर असलेलं आकर्षक मंदिर आणि आसपासचा नयनरम्य परिसर यामुळे साजगावची यात्रा प्रसिद्ध झाली. रायगड समवेत आसपासच्या परिसरातील लाखो भाविक यात्रेला हजेरी लावतात.
15 दिवस चालणारी ही यात्राही आगळीवेगळी असते. सुकी मच्छी, बैल, मिठाई आणि घोंगड्यांचा बाजार यावेळी अतिशय तेजीत असतो. बोंबल्या विठोबाच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात. या यात्रेतील सुक्या मासळीची दुकानं हे यात्रेचं मुख्य आकर्षण आहे. केवळ सुक्या मासळीच्या उद्योगातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.
विठूराया हे अवघ्या महाराष्ट्राचं श्रदधास्थान. पण रायगड जिल्ह्यात त्याचं वेगळं रुप आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळेच खोपोलीचं हे ग्रामदैवत केवळ जिल्हावासियांचंच नाही, तर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement