Michael Vaughan on Rohit Sharma : 'जर तुझे नाव रोहित शर्मा नसते, तर तू संघाबाहेर असता...', 3 सामने, 20 चेंडू अन् 21 धावा करणाऱ्या हिटमॅनवर सडकून टीका, कोण म्हणालं?
तोच रोहित शर्मा ज्याची दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जग प्रशंसा करत होते, आता त्याचा फॉर्म खराब झाल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Michael Vaughan slams Rohit Sharma : क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे, 'जब तक बल्ला चल रहा है, ठाठ चल रहा है. जब बल्ला नहीं चलेगा तो फिर... असे का म्हणतो कारण तोच रोहित शर्मा ज्याची दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जग प्रशंसा करत होते. आता त्याचा फॉर्म खराब झाल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण म्हणजे आयपीएल 2025 मध्ये हिटमॅनची बॅट आतापर्यंत अजून तरी शांत आहे. रोहितला तीन सामन्यांतून एकदाही 20 धावाचा टप्पा ओलांडता आलेला नाही. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एक मोठे विधान केले आहे.
सोमवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने पराभव केला आणि हंगामातील पहिला विजय नोंदवला. पॉइंट्स टेबलवर संघाने खाते उघडल्याने चाहते आनंदी असले तरी, रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. दरम्यान, माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनने तर असेही म्हटले की, रोहित शर्मा फक्त त्याच्या नावामुळे खेळत आहे, अन्यथा तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र नाही.
मायकेल वॉनची रोहित शर्मावर सडकून टीका
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे विश्लेषण करताना मायकेल वॉन म्हणाला की, 'आता रोहित शर्माला फक्त एक फलंदाज म्हणूनच पाहिले जाईल, कारण तो संघाचा कर्णधार नाही. रोहितचा वापर आता इम्पॅक्ट खेळाडू म्हणून केला जात आहे. कारण फ्रँचायझीने बहुतेक सामन्यांमध्ये त्याच्या मैदानावरील अनुभवाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर त्याचे नाव रोहित शर्मा नसते, तर कदाचित खराब कामगिरीमुळे तो संघाबाहेर असता.
मायकेल वॉन म्हणाला की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार का नाही हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. मला नेहमीच प्रश्न पडतो की जर तो भारतीय कर्णधार होण्याइतका चांगला आहे, तर तो मुंबईचा कर्णधार का नाही? कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी उत्तम काम केले आहे.
रोहितची आयपीएल 2025 मधील कामगिरी
रोहित शर्माला आयपीएल 2025 मध्ये अजून काहीही अद्भुत कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली आणि 8 धावा काढल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याला बोल्ड केले. सोमवारी केकेआरविरुद्धही हिटमन अपयशी ठरला आणि फक्त 12 धावा करून बाद झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शर्मा आयपीएलमध्ये 127 वेळा 20 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे. तो या बाबतीत आघाडीवर आहे.





















