Beed Crime Satish Bhosale: खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं; तडकाफडकी करण्यात आलं निलंबन
Beed Crime Satish Bhosale: खोक्याला जिल्हा कारागृह बाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

बीड: बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या खोक्या भाईला पोलिसांकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बीड पोलिसांकडून (Beed Police) खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला (Khokya Bhai) बीड पोलिसांनी जेलबाहेर आणल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा सुग्रास बेत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच व्हिडीओत खोक्या बिनधास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोमवारी दुपारी काढण्यात आलासांगितले जात आहे. वाल्मिक कराड पाठोपाठ सतीश भोसले याच्यासारख्या नामचीन गुंडाला बीड पोलिसांकडून शाही वागणूक दिली जात असल्याचे पोलीस दलाबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर यामध्ये इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहाबाहेर सतीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. त्याबरोबरच ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे.
तुरुंगाच्या आवारात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला खोक्या उर्फ सतीश भोसलेचा व्हिडीओ हा सोमवारी दुपारी काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी पोलिसांनी खोक्याला तुरुंगाबाहेर आणले होते. व्हिडिओत सतीश भोसले हा एखाद्या व्हिआयपी व्यक्तीच्या थाटात पोलिसांच्या कोंडाळ्यात उभा असलेला दिसत आहे. याठिकाणी खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिनधास्तपणे भेटताना दिसत आहेत. या भेटीगाठीसाठी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यावेळी खोक्या भाई बिनधास्त फोनवर बोलतानाही दिसत आहे. तो त्याच्या कार्यकर्त्यांना भेटताना दिसतो.
सतीश भोसले उर्फ खोक्याबरोबर पोलिसांसोबत सुरेश धस यांच्या जवळचा असलेला बीड जाळपोळीच्या घटनेतील आरोपी अजिंक्य पवळ(काळे शर्ट)आणि इतर कार्यकर्त्यांचा (खाजगी लोकांचा) बिनधास्त वावर दिसत आहे. कारागृहाच्या आवारात खोक्या अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी जेवणाचे खास डब्बे आल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, गाठी, आणि मोकळ्या वातावरणाचा अस्वाद खोक्या घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपीची पोलिसांकडून इतकी शाही बडदास्त का आणि कशासाठी ठेवली जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा
बसने प्रयागराजला पोहचला अन् तिकडून सटकण्याची तयारी केली; खोक्या सतीश भोसले जाळ्यात कसा अडकला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
