Aurangabad News: कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; औरंगाबादच्या वडजी गावातील घटना
Aurangabad Farmer Suicide: सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्यातून स्वतःच्या शेतात जाऊन तरुणाने विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केली.
Aurangabad Farmer Suicide: औरंगाबादच्या (Aurangabad) पाचोड परिसरातील वडजी गावात धक्कादायक घटना समोर आली असून, सततच्या नापिकीमुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) करत टोकाचे पाऊल उचलले आहे. सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्यातून स्वतःच्या शेतात जाऊन या तरुणाने विषारी द्रव्य सेवन करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (20 फेब्रुवारी) रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. अक्षय दिलीप गोजरे (वय 26 वर्षे, वडजी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील वडजी गावातील अक्षय गोजरे याने शेतकामासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. यावर्षी चांगले उत्पन्न होईल आणि त्यातून बँकेचे कर्ज फेडण्याचा त्याचा मानस होता. त्यासाठी त्याने शेतात मोठ्या कष्टाने पिकांची पेरणी देखील केली. मात्र सुरवातीला अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे लावलेला खर्च देखील निघाले नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेलं कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न अक्षयला पडला होता. त्यामुळे तो सतत चिंतेत असायचा.
शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला
मोठ्या अपेक्षेने शेतात पीके लावली असताना, अतिवृष्टीमुळे हातात काहीच आले नाही. त्यामुळे बँकेचे कर्जाच्या फेडण्याची चिंता आणि आलेल्या नैराश्यामुळे अक्षयने टोकाची भूमिका घेतली. रविवारी रात्री घरच्यांसोबत जेवण करुन, शेतातील पीकांना पाणी देण्यासाठी जातो असे सांगत घराबाहेर पडला. दरम्यान सोमवारी सकाळी परतला नाही म्हणून, त्याचे वडील दिलीप गोजरे हे शेतात बघण्यासाठी गेले. मात्र त्यांना अक्षय हा शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तर त्याने विषारी औषध पिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या घटनेची तत्काळ नातेवाईकांसह गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना माहिती कळविली.
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
अक्षयने विषारी औषधाचे सेवन केल्याचं कळताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अक्षयला उपचारार्थ पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तसेच तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेबद्दल वडजीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! साडेपाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ