Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Dhananjay Munde : राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यात मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
Dhananjay Munde : राज्य सरकारने शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, शनिवारपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. आज माध्यमांशी बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय.
मुंडेंना इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, बीडमधील स्थानिक परिस्थितीत पाहता अजित पवारांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर पुढे निर्णय घेता येईल. कारण हे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. मुंडे प्रकरण जमिनीवर कमी मीडियामध्ये जास्त आहे. बीड कार्यकारिणीबाबत लवकरच निर्णय होईल. कागद, पेन घेऊन फिरणारे कार्यकर्ते नको जे काम करतात त्यांना प्राधान्य दिलं जाईल. मुंडेंना आम्ही इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो. परंतु, सध्या ग्राउंडवर जी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना पालकमंत्रिपद दिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
...तर मुंडेंना पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल
तर बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, माझ्यावर गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. मी समाधानी आहे. मी लातूर जिल्ह्याची मागणी केली नव्हती. जो निर्णय अजित पवार घेतील तो आम्हाला मान्य असतो. बीडची जबाबदारी अजित पवारांना देण्यात आली आहे. उद्या जाऊन मुंडेवरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर मग त्यांना पुढे जाऊन पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा