Aurangabad Crime: पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया; धमकी देणाऱ्या फोननंतर औरंगाबाद पोलिसांची धावपळ
Aurangabad Crime News: श्वानांनी सर्व परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Aurangabad Crime News: एका अज्ञात फोन कॉलने औरंगाबाद शहर पोलिसांची (Aurangabad City Police) चांगलीच धावपळ उडाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. 'पैसे देकर भी काम नहीं होते, इसलिए मैंने हायकोर्ट में बॉम्ब रख दिया' असे सांगणारा निनावी फोन शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आला. फोन करणाऱ्याने शहरातील एका वकिलाचे नाव आणि मोबाइल नंबर सांगून फोन कट केला. त्यानंतर शहर पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. बॉम्बशोधक नाशक पथकासह हायकोर्ट सुरक्षा, पुंडलिकनगर ठाण्याच्या पोलिसांनी खंडपीठात धाव घेतली. मात्र श्वानांनी सर्व परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बचा कॉल फेक असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
औरंगाबाद शहर पोलिसांच्या आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान बिहारमधून एक फोन आला. यावेळी फोन करणारी समोरील व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होती. 'पैसे देकर भी काम नही होते, इसलीए मैंने हायकोर्ट मे बॉम्ब रख दिया' असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. सोबतच खंडपीठ, जिल्हा न्यायालयात वकिली करणारे अँड. दत्तात्रय जाधव यांचे नाव आणि मोबाईल नंबर देऊन फोन कट केला. विशेष म्हणजे, हा फोन एका अँपच्या माध्यमातून करण्यात आला होता.
...अन् सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला
हायकोर्ट उडवून देण्याची धमकी मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने बॉम्बशोधक आणि नाशक पथकाचे (बीडीडीएस) निरीक्षक सशील जमडे यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे काही वेळातच निरीक्षक जुमडे हे झेबा आणि ईवा या दोन श्वानांसह हायकोर्टात पोहोचले. तसेच तपासणीला सुरुवात केली. हायकोर्टाच्या मुख्य इमारतीसह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरही श्वानपथकाने तपासणी केली. मात्र या पथकाला काहीही आक्षेपाई आढळले नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे, हायकोर्ट सुरक्षेचे निरीक्षक हनुमंत गिरमे, सायबर ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांची पथके मदतीला होती.
पोलिसांचा कॉल जाताच जाधव यांना धक्का बसला....
दरम्यान, कॉल करणाऱ्याने दिलेला मोबाइल क्रमांक सायबर पोलिसांना देऊन तांत्रिक तपास करण्यात आला. त्यानंतर अँड. दत्तात्रय जाधव यांना फोन केला असता ते मुलांना आणण्यासाठी शाळेत असल्याचे कळले. तर पोलिसांचा कॉल जाताच जाधव यांना देखील धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तत्काळ हायकोर्टात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. तर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महत्वाच्या इतर बातम्या :
Aurangabad Crime News: मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
