Aurangabad News: कामगार आपल्या विरोधात बोलतो म्हणून वकिलाचं भयंकर कृत्य; घटना सीसीटीव्हीत कैद
Aurangabad : विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वकिलाने केलेले भयंकर कृत्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. माझ्या विरोधात का बोलतोस, असे म्हणत एका वकिलाने मजुराच्या अंगावर कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार 5 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता बीड बायपासवरील महूनगर येथे घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सातारा पोलिसांनी एकाला अटक केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. किरण प्रकाश राजपूत असे या वकिलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश देविदास अहिरे (वय 28 वर्षे, रा. गल्ली क्र. 1, महनगर, बीड बायपास) हा टाइल्स बसविण्याचे काम करतो. तर 5 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता तो, त्याचा मित्र रितेश शिरसाठ, शरद रोटे गणेश सोनवणेशी बोलत होते. दरम्यान 4 फेब्रुवारीला किरण राजपूतच्या कारचा 50 ग्रीन्स सोसायटीमधील एका मुलाच्या कारला अपघात झाला होता. त्याबाबत योगेश अहिरेने गणेशला बोलताना, झाले गेले सोडून द्या, असे सुचविले. मात्र योगेश काय म्हणाला याबाबत गणेश सोनवणेने राजपूतला फोन करून सांगितले.
योगेश काय म्हणाला याबाबत गणेश सोनवणे याने आरोपी किरणला फोनवरून माहिती दिली. त्यामुळे राजपूत त्याची कार सुसाट वेगात घेऊन घटनास्थळी आला. तसेच अहिरे, शिरसाठ, रोटे हे बोलत असलेल्या ठिकाणी येऊन त्याने थेट अहिरेला कारने उडविले. तो कारच्या धडकेने खाली पडल्यावर राजपूत खाली उतरला आणि त्याने धक्का मारून अहिरेला मारहाण केली. त्यानंतर अहिरेने त्याच्या भावाला हा प्रकार सांगितला. ते दोघे सातारा पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी मेडिकल मेमो दिला. त्यानंतर या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक संभाजी गोरे करीत आहेत.
याप्रकरणात किरण प्रकाश राजपूत, गणेश मगन सोनवणे आणि एक अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत. गणेश सोनवणेला सातारा पोलिसांनी अटक केली.त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
थोडक्यात जीव वाचला!
या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात वकील असेलल किरण राजपूत आपली कार सुसाट वेगाने घेऊन येऊन योगेशच्या अंगावर घालताना पाहायला मिळत आहे. ज्यात योगेश खाली पडला. मात्र थेट अंगावरून कार गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Abortion Case: औरंगाबाद गर्भपात प्रकरणातील धक्कादायक माहिती; मोठं रॅकेट असण्याची शक्यता