Raju Shetti : काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून शिका, त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं, मग आम्हाला अवघडं आहे का?
Raju Shetti Akola Sabha Speech : समृद्धी महामार्गावर राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी, त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करून राज्यात सत्तांतर झाल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
अकोला : माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशपासून काहीतरी शिकावं, आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते. शेतकरी सहविचार सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही.
बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या देश सोडून भारतात आल्या. त्याचाच संदर्भ देत राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला झाला?
समृद्धी महामार्गावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कुणाकुणाला मिळाला हे स्पष्ट होईल असं ते म्हणाले. 2019 पासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यात हाच पैसा वापरला गेल्याचा आरोप त्यांनी केला. राधेश्याम मोपलवार हा अधिकारी दोन्ही सरकारच्या काळात मोठ्या पदावर कसा राहतो? असा सवालही राजू शेट्टी यांनी विचारला. याचबरोबर प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग कुणाच्या भल्यासाठी तयार केला जातोय असाही प्रश्न त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर, प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज जरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या संभाव्य आघाडीत रविकांत तुपकर आल्यासही आपली हरकत नसेल असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
ही बातमी वाचा: