(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : काय सांगता! चक्क जमीनीच्या आतून वाहते 'ही' अनोखी नदी? रामायणाशी संबंधित रहस्य, नेमकं सत्य काय?
Travel : भारतात एक अशी नदी आहे, जी जमीनीच्या आतून वाहते. यामुळे तिला अंत सलिला असेही म्हणतात. पण, या अनोख्या नदीमागील कथा काय आहे ते जाणून घेऊया.
Travel : भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी रहस्यांनी भरलेली आहेत. काही ठिकाणांची रहस्य इतिहासकारांसाठी आजही कोडंच आहे. तसं पाहायला गेलं तर भारतात नद्यांना देवी स्वरूप म्हणून पूजा केली जाते. पृथ्वीवर अशा अनेक नद्या आहेत ज्यांचा स्वतःचा इतिहास आहे. पण तुम्ही कधी कल्पना केलीय का? देशात एक नदी आहे जी जमीनीच्या आत वाहते? हो हे खरंय आणि काही भाविकांची तर यावर अढळ श्रद्धा देखील आहे, असं म्हणतात या नदीचा इतिहास रामायणाशी जोडलेला आहे. काय आहे यामागील आख्यायिका? नेमकं सत्य काय? जाणून घेऊया
भाविकांची अढळ श्रद्धा..!
या नदीचे नाव फाल्गु नदी असून ही भारतातील बिहारमधील गया येथे आहे. येथे येणारे भाविक जमीनीच्या आतून वाळू काढून नदीचे पाणी काढतात, त्यानंतर आपल्या पूर्वजांना प्रार्थना करतात. ही नदी जमीनीच्या आतून वाहते. यामुळे तिला अंत सलिला असेही म्हणतात विशेष म्हणजे या अंता सलीलावर लोकांची अढळ श्रद्धा आहे. या नदीबद्दल सांगायचं म्हणजे ही नदी वर्षभर कोरडी दिसते आणि तिच्या पाण्याचा प्रवाह आतून वाहतो. असे मानले जाते की, या नदीचा संबंध रामायणाशी असून देवी सीता आणि भगवान राम यांच्याशी संबंधित एक मोठे रहस्य आहे. सविस्तर जाणून घेऊया.
या नदीचा रामायणाशी संबंध? जाणून घ्या..
मोक्षनगरी गया जिल्ह्यातील विष्णुपद मंदिराच्या काठी वाहणाऱ्या फाल्गु नदीत पाण्याचा साठा राहत नाही. याचे कारण देवी सीतेचा शाप मानला जातो. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात भगवान रामांचे वडील राजा दशरथ यांच्या निधनानंतर, भगवान राम पिंडदान करण्यासाठी त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह गयाधामला पोहोचले होते. दरम्यान भगवान राम काही साहित्य गोळा करण्यासाठी तेथून भाऊ लक्ष्मण यांच्यासह निघाले. दरम्यान, आकाशातून एक आकाशवाणी झाली, ज्यामध्ये पिंड दानची वेळ जवळ येत असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून माता सीतेने स्वतः सासरे राजा दशरथ यांना पिंड दान अर्पण केले. त्यावेळी गाय, कावळा, पंडित आणि फाल्गु नदीला त्याचे साक्षीदार केले. जेव्हा भगवान श्रीराम भाऊ लक्ष्मण सोबत परतले, तोपर्यंत पिंडदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यावर प्रभू रामांनी पिंडदानाबद्दल विचारले असता देवी सीतेने संपूर्ण कथा सांगितली. यासोबतच पंडित, गाय, कावळा आणि फाल्गु नदीलाही त्यांनी साक्षीदार म्हणून संबोधले. पण जेव्हा रामाने पिंड दानाबद्दल हे चार प्रश्न विचारले तेव्हा फाल्गु नदीने खोटे सांगितले की माता सीतेने पिंड दान केले नाही. हे ऐकून माता सीतेला राग आला आणि त्यांनी फाल्गु नदीला शाप दिला. धार्मिक आख्यायिकांनुसार, तेव्हापासून फाल्गु नदी आटली. यानंतर फाल्गु नदी भूगर्भातून वाहू लागली.
फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान आणि तर्पण
पिंड दानासाठी फाल्गु नदीला खूप महत्त्व आहे. फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान आणि तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांना उत्तम गतीने मोक्ष प्राप्त होतो, अशी प्रचलित धारणा आहे. येथे पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांसह कुटुंबातील सात पिढ्यांचा उद्धार होतो, असे सांगितले जाते. एवढेच नाही तर पिंड दान करणारा स्वतः परम स्थिती प्राप्त करतो. मात्र, देशात श्राद्धासाठी एकूण 55 महत्त्वाची ठिकाणे आहेत, त्यापैकी बिहारमधील गया सर्वात महत्त्वाचे मानले जाते.
फाल्गु नदीत रबर डॅम बांधण्यात आला
विष्णू नगरी गयाची फाल्गु नदी हे एक सुंदर ठिकाण आहे. पण, त्यात पाणी आणण्यासाठी सरकारने येथे रबर डॅम बांधला आहे, ज्यामुळे वर्षभर फाल्गु नदीत पाणी पाहायला मिळते. मात्र, हे पाणी कृत्रिमरीत्या आणण्यात आले आहे.
हेही वाचा>>>
Travel : भारतातील एक दैवी शक्तीपीठ! 'येथे' पडला होता देवी सतीच्या स्तनाचा तुकडा? 'अशी' करा ट्रीप प्लॅन
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )