Child Safety : पालकांचं टेन्शन वाढतंय, स्कूलबसमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालकाने 'हे' नियम जाणून घ्या
Child Safety : आजकाल पालकांचे टेन्शन वाढत आहे. जर तुमचे मूल बसने शाळेत जात असेल, तर तुम्हाला शाळेच्या बसमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम माहित असणे आवश्यक आहे.
Child Safety : महिलांच्या सुरक्षितेसोबतच लहान मुलांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरतेय. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांना नेहमीच काळजी असते. सध्या घडत असलेल्या विविध घटनांमुळे पालकांचे टेन्शन आणखी वाढत आहे. जर तुमचे मूल बसने शाळेत जात असेल, तर तुम्हाला शाळेच्या बसमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम माहित असणे आवश्यक आहे. जाणून घ्या...
शाळांमध्ये मुलींची छेडछाड आणि लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर
काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका खासगी स्कूल बसमध्ये मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. यापूर्वीही शाळांमध्ये मुलींची छेडछाड आणि लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय स्कूल बस अपघात आणि ओव्हरस्पीडिंगच्या अनेक बातम्याही रोज ऐकायला मिळतात. शाळा आणि स्कूल बसमध्ये अशा घटना पालकांसाठी निःसंशयपणे चिंतादायक ठरू शकतात. स्कूल बसेसच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक सूचना आहेत, ज्यांचे पालन केले पाहिजे. पालकांनी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या मुलाच्या स्कूल बसमध्ये हे नियम पाळले जात नसतील, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.
स्कूल बसमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे नियम
- स्कूल बसच्या पुढील व मागील बाजूस 'स्कूल बस' असे लिहावे.
- शाळेच्या ड्युटीसाठी बस भाड्याने घेतल्यास, त्यावर 'ऑन स्कूल ड्यूटी' असे लिहिलेले असावे.
- बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी.
- बसमध्ये अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे.
- बसवर शाळेचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक लिहावा.
- बसच्या खिडक्यांना आडव्या ग्रिल असावेत, जेणेकरून मुले सुरक्षित राहतील.
- बसचे दरवाजे विश्वसनीय लॉक्सनी सुसज्ज असले पाहिजेत.
- स्कूल बॅग व्यवस्थित ठेवण्यासाठी सीटखाली जागा असावी.
- बसमध्ये शाळेतील एक परिचर असणे आवश्यक आहे.
- स्कूल बसेसची कमाल वेगमर्यादा ताशी 40 किलोमीटर असावी.
- शालेय कॅब किंवा स्कूलबसचा रंग हायवे पिवळा असावा.
- बसच्या भोवती मध्यभागी 150 मिमी रुंदीचा हिरवा आडवा पट्टा असायला हवा
- 'स्कूल कॅब' असा शिलालेख बसभोवती स्पष्टपणे दिसला पाहिजे.
- स्कूल बस चालकाकडे किमान चार वर्षांच्या कालावधीसाठी LMV-वाहतूक वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे
- चालकाने हलका निळा शर्ट, हलका निळा पँट आणि काळे शूज घालणे आवश्यक आहे.
- बस चालकाचे नाव त्याच्या आयडी शर्टवर असणे आवश्यक आहे.
- स्कूल बसमध्ये कोणती मुले आहेत, किती मुले आहेत, त्यांचा वर्ग, घराचा पत्ता, रक्तगट आणि मार्ग याची संपूर्ण यादी बस चालकाकडे असावी.
- स्कूल बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही असणे बंधनकारक आहे.
- या कॅमेऱ्यांचे फुटेज 60 दिवस ठेवावे.
- चालकाने मुलांशी विनाकारण बोलणे चुकीचे आहे.
- याबाबत तक्रार करता येईल.
हेही वाचा>>>
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )