Nana Patekar : शूटींगदरम्यान आगीत गंभीर होरपळले होते नाना पाटेकर, पापण्या आणि दाढीलाही लागली होती आग; 'तो' किस्सा वाचा
Nana Patekar BTS Scenes : एकदा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान नाना पाटेकर आगीत गंभीररित्या होरपळले होते. त्यांच्या पापण्या आणि दाढीनेही आगीत पेट घेतला होता.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) फिल्म इंटस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. नाना पाटेकर यांनी अनेक नाटके आणि चित्रपटांत काम केलं आहे. नानांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नानांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत, त्यापैकी 'क्रांतिवीर' (Krantiveer) आणि 'परिंदा' (Parinda) हे अविस्मरणीय चित्रपट आहेत. पण या चित्रपटांतील काही दृश्ये खरी असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल. या चित्रपटाचं चित्रीकरण करताना नाना पाटेकर गंभीर जखमी झाले होते.
शूटींगवेळी गंभीर जखमी झाले होते नाना पाटेकर
नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअरमधील अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. नानांनी सेटवर जखमी झाल्याचा एक किस्सा सांगितला आहे. एकदा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान नाना पाटेकर आगीत गंभीररित्या होरपळले होते. त्यांच्या पापण्या आणि दाढीनेही आगीत पेट घेतला होता.
पापण्या आणि दाढीलाही लागली होती आग
नाना पाटेकर यांनी त्यांच्या मुलाखतीत या चित्रपटातील दमदार दृश्यांबद्दल सांगितलं आहे. 'परिंदा' चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटींगवेळी ते अक्षरशः आगीत होरपळले होते, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. यामुळे त्यांना वर्षभर काम करता आलं नाही. त्याची त्वचा, दाढी आणि पापण्या आगीत जळाल्या होत्या. याशिवाय 'क्रांतीवीर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले, त्यामुळे ते जखमी झाले होते, असंही त्यांनी सांगितलं.
गंभीर जखमी झाल्यामुळे महिनाभर नाना पाटेकर अंथरुणाला खिळून
'परिंदा' चित्रपटाच्या शूटची आठवण सांगताना नाना पाटकरांनी सांगितलं की, सुरुवातीला या चित्रपटातील जॅकी श्रॉफची भूमिका त्यांना ऑफर करण्यात आली होती, पण नंतर त्यांना अण्णांची भूमिका मिळाली आणि हे पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. चित्रपटात त्याचे पात्र क्लायमॅक्समध्ये आगीत होरपळताना दाखवण्यात आलं होतं आणि त्यावेळी तंत्रज्ञान फारसं नव्हतं, त्यामुळे आग खरी होती. विधू विनोद चोप्रा यांनी सेटवर खरी आग लावली आणि त्यात नाना पाटेकर चांगलेच भाजले. आगीत गंभीर जखमी झाल्यामुळे महिनाभर ते अंथरुणाला खिळून होते.
'आग खरी होती आणि मी जळत होतो'
लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीतल नाना पाटेकर म्हणाले, “आग खरी होती आणि मी खरोखर जळत होतो. त्या शूटनंतर मी एक वर्ष काहीही करू शकलो नाही. मला 60 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या दृश्यात मी स्वत:ला आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी प्रत्यक्षात मी जळत होतो. माझी सर्व त्वचा भाजली होती, काहीही राहिलं नव्हतं. फक्त दाढी उरली होती, मिशा, भुवया किंवा पापण्याही जळाल्या होच्या. मी सहा महिने विश्रांतीवर होतो.