(Source: Poll of Polls)
Makarand Deshpande : 'जे करताय त्यासाठी मी तुमच्या पाठिशी', मकरंद देशपांडेंनी सांगितला मनोज जरांगेंच्या भेटीचा किस्सा
Makarand Deshpande : मकरंद देशपांडे यांनी आम्ही जरांगे सिनेमावेळी मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यावेळचा किस्सा सांगितला आहे.
Makarand Deshpande : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आधारित आम्ही जरांगे हा सिनेमा येत्या 24 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांनी मनोज जरांगे यांची भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी यादरम्यान मनोज जरांगेंची भेट देखील घेतली. नुकतीच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनोज जरांगेंच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभारला तो आता मोठ्या पडद्यावरही साकारला जातोय. आम्ही जरांगे या सिनेमातून मराठा आरक्षणाचा संपूर्ण लढा दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात मकरंद देशपांडे अजय पुरकर, प्रसाद ओक, सुबोध भावे अशी बरीच कलाकार मंडळी आहेत. दरम्यान या टीमने अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
त्यांच्या डोक्यात चित्रपटासाठी जागाच नव्हती - मकरंद देशपांडे
जेव्हा जरांगेंना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या उपोषणाची तयारी सुरु होती. त्यांना कौतुक वाटलं. पण खरं सांगू का जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोक्यात चित्रपटासाठी जागाच नव्हती. कारण एवढं मोठं काम ते करत आहेत, की त्यांचं असं होतं की, तुम्ही करताय ती तुमची भावना आहे, पण त्यात मला काही करायला सांगू नका. पण त्यांना एक होतं, तुम्ही करताय ना एका भावनेने करताय, मी तुमच्या सोबत आहे. आम्ही पण त्यांना आम्ही चित्रपटात काय केलं आहे, हे सांगितलं. त्यांच्यासाठी मी एक छान गणपती घेऊन गेलो होतो. त्यांना ते फार कौतुक वाटलं. त्यांना त्रास न देता आम्ही भेटलो, असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी म्हटलं की, त्यांचं भाषण अगदी साधं असतं आणि विशेष म्हणजे त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील ते असेच भेटतात. म्हणजे अगदी सगळ्यांना भेटतात, त्यांचं असं अजिबात नसतं की कोण कुठला आमदार वैगरे आहे, प्रत्येकाला भेटण्याची त्यांनी पद्धत सारखीच आहे. त्यामध्ये जराही बदल नाहीये.