Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशी बायकोला काय सांगितलं होतं? समोर आली महत्त्वाची माहिती
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 7 आणि 8 डिसेंबरला काय घडलं होतं, याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. संतोष देशमुख नेमकं काय म्हणाले होते?

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या सुनावणीला बुधवारी केज सत्र न्यायालयात सुरुवात झाली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापले म्हणणे मांडले. यावेळी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या पत्नीने नोंदवलेल्या जबाबातील धक्कादायक माहिती समोर आली. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्यांचे लोक मला मारुन टाकतील, असे संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होते.
वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारुन टाकतील. संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला तसे सांगितलं होते, अशी धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातील अश्विनी देशमुख यांच्या जवाबात समोर आली आहे. दिनांक 08 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चादेखील झाली होती. 7 आणि 8 डिसेंबरला काय घडलं होतं, याचा उल्लेख अश्विनी देशमुख यांनी त्यांच्या जवाब दिलेला आहे. सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला आहे.
वाल्मिक कराडचा साथीदार विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांनी पत्नीला फोनवरील संभाषणाबाबत सांगितले होते. त्यामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना म्हणाला की, 'तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही'. या फोननंतर संतोष देशमुखांनी मला खूप टेन्शन आल्याचे पत्नीला म्हटले होते. त्यावर (पत्नी अश्विनी देशमुख) मी धीर दिला.. तूम्ही कोणाचे वाईट केले नाही. त्यामुळे तुमचे कोणी वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, असे मी त्यांना सांगितल्याचे संतोष देशमुखांच्या पत्नीने जबाबात म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या डोक्यात काळजीचा भुंगा शिरला
विष्णू चाटे याचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख प्रचंड घाबरले होते. त्यांच्या डोक्यात काळजीचा भुंगा शिरला होता. पत्नीने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतोष देशमुख पत्नीला म्हणाले की, (संतोष देशमुख) तुला माहिती नाही, तो वाल्मीक कराड हा गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यासोबत उठबस आहे. तो आणि त्यांचे लोकं मला मारून टाकतील, असं शेवटचं प्रत्यक्ष संभाषण झालं होतं, असं संतोष देशमुखांच्या पत्नीने जबाबात म्हटले आहे.
आणखी वाचा























