Siddharth jadhav : अमिताभ बच्चन यांना काका म्हणता का? मराठीत अशोक सराफांचाही मान मोठा; राज ठाकरेंच्या भूमिकेवर सिद्धार्थ जाधवचं मत
Siddharth jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नुकतच राज ठाकरे यांचा एक अनुभव सांगितला आहे. तसेच यावेळी त्याने राज ठाकरेंच्या भूमिकेचंही समर्थन केलं आहे.
Siddharth jadhav : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 100 व्या नाट्य संमेलनावेळी मराठी कलाकारांचे कान टोचले होते. मराठी कलाकारांनी कलाकारांना व्यासपीठावर किंवा चार लोकांमध्ये मानानेच बोलायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर मराठी कलाकारांनी देखील राज ठाकरेंच्या या भूमिकेवर सहमती दर्शवली. त्यातच आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth jadhav) देखील यावर भाष्य केलं आहे. तसेच त्याने 2011 च्या वर्ल्डकपचा देखील एक अनुभव सांगितला आहे.
राज ठाकरे बोलले ते 100 टक्के खरंय - सिद्धार्थ जाधव
राज ठाकरे जे बोलले ते 100 टक्के खरं आहे. अशोक सराफांना तुम्ही अशोक मामा म्हणा ना पण त्यांना चार लोकांमध्ये सरच म्हटलं पाहिजे. हिंदीमध्ये तुम्ही अमिताभ काका म्हणता का, अमिताभ बच्चन साहेबांचा जो हिंदीत मान आहे तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडा जास्त अशोक सराफ सरांना मराठीत आहे. त्यामुळे राज साहेबांचं हे म्हणणं अगदीच खरं आहे.
... आणि मला राज ठाकरेंचा फोन आला - सिद्धार्थ जाधव
वर्ल्डकपसाठी मी 2011 मध्ये लिहायचो. त्यामध्ये मी धोनी बद्दल लिहियचो, सचिन तेंडूलकरचा मी तेंडल्या असा उल्लेख करायचो, आज तेंडल्या सेंच्युरी मारणार म्हणजे मारणार वैगरे. एक दिवशी मला फोन आला, हॅलो सिद्धार्थ जाधव, राजसाहेब बोलतोय. पुढे ते म्हणाले की, मी तुम्हाला कधी सिद्धू, सिद्ध्या अशी हाक मारली आहे का? मी म्हणलो नाही सर, मग ते म्हणाले सचिन तेंडूलकरला तुम्ही तेंडल्या म्हणता हे योग्य आहे का? तुम्ही लिहिता पण आपण आदर करणंही गरजेचं आहे. मला ही गोष्ट इतकी आवडली ना. म्हणजे सिद्धार्थ जाधव एक कलाकार काय करायचं पण त्यांनी फोन करुन मला हे सांगितलं.
मराठी कलाकारांचा ते आदर करतात - सिद्धार्थ जाधव
त्यांनी माझं जागो मोहन प्यारे हे नाटक पाहिलं, तेव्हा ते म्हणाले होते की, सिद्धार्थ सारखी उर्जा असणारा कलाकार इंडस्ट्रीत आता नाही. त्यांना प्रत्येक मराठी कलाकाराचा आदर आहे. म्हणजे कोणताही कलाकार त्यांना कधीही भेटायला गेला तर ते त्याच्याशी सिनेमाविषयीच बोलतात, कोणत्याही राजकीय गप्पा मारत नाहीत.त्यामुळे मला नेहमी त्यांचा आदर वाटतो. म्हणूनच आमच्यासाठी ही खूप गोष्ट आहे की, ते आमच्यासारख्या कलाकारांसाठी ते 100 व्या नाट्य संमेलनामध्ये अशा गोष्टी सांगतात.
ही बातमी वाचा :
रविना टंडनविरोधात तक्रार दाखल, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धमकी दिल्याचा आरोप!