विधानसभेच्या प्रचाराला भाजपाकडून व्हिडीओची फोडणी! नानाभाऊंचा उल्लेख करत 'लाडक्या बहिणीं'ना मतदानाची साद!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून भाजपाने काँग्रेसला थेट लक्ष्य केलं आहे. भाजपाने एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित केला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसत आहेत. पाच वर्षांत महायुतीने कोणतेही काम केलेले नाही. यावेळी राज्यातील जनता त्यांना सत्तेतून खाली खेचणार आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून केला जात आहे. तर आम्ही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक काम केले असून जनता आम्हाला पुन्हा एकदा निवडून देईल, असं सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष म्हणत आहेत. दरम्यान, एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असताना महायुती विरोधकांवर एक गंभीर आरोप करत आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना रद्द होईल, अशा दावा महायुतीकडून केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपाने प्रचारासाठी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसला लक्ष्य
भाजपाने नुकतेच हा व्हिडीओ सगळीकडे प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाने काँग्रेसला थेट लक्ष्य केलं आहे. एक मिनिट आणि 13 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रद्द करतील, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. तसेच या योजनेतून मिळणारे पैसे हे महिला वेगवेगळ्या कामांसाठी वापरत आहेत, महिलांना मिळत असलेल्या पैशांचा चांगला वापर होत आहे, असेही या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ :
लाडकी बहीण योजनेचा आधार घेत भाजपाकडून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा अशा प्रकारे प्रयत्न केला जातोय.#ladkibahinyojna #BJP #Congress #MaharashtraElection2024 pic.twitter.com/UScJlLbeCj
— Prajwal Dhage (@prajwaldhage100) October 27, 2024
भाजपाच्या या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?
भाजपाने या व्हिडीओच्या माध्यमातून थेट काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे भाजपाने आपल्या या व्हिडीओत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे थेट नाव घेतले आहे. काँग्रेसकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट घातला जात आहे, असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भाऊबीजचा संदर्भ देत भाजपाने महिला मतदारांना साद दिली आहे. भाजपाचा हा व्हिडीओ सध्या सोसल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिला मतदार महायुतीला साथ देणार का?
दरम्यान, राज्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. महिला मतदाररांची हीच संख्या लक्षात घेऊन सत्ताधारी महायुतीने जुलै महिन्यात महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आम्ही सत्तेत आलो तर आम्ही ही रक्कम आणखी वाढवू, असे आश्वास सत्ताधारी महायुतीकडून दिले जात आहे. तर विधानसभा निवडणूक संपताच महायुती ही योजना बंद करणार आहे, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. सोबतच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देऊन महिलांना प्रलोभन देण्याचाच हा प्रयत्न आहे, अशी टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील महिला मतदार महायुतीच्या पाठीशी उभ्या राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :