Kolhapur Uttar Vidhan Sabha : षड्यंत्र करून माझी उमेदवारी रद्द करण्यात आली; राजेश लाटकरांचा शाहू महाराजांसमोर थेट आरोप
उमेदवारी अर्ज माघारीसाठी चार नोव्हेंबर रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे मनधरणीसाठी आता थेट छत्रपती कुटुंबीय पोहोचल्याने राजेश लाटकर आपली उमेदवारी मागे घेणार का याकडे लक्ष असेल.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळून सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये उमेदवारीच काँग्रेसकडून रद्द करण्यात आल्याने अत्यंत नाराज झालेल्या राजेश लाटकर यांच्या भेटीसाठी आज (3 नोव्हेंबर) काँग्रेस खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर उत्तरच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे थेट निवासस्थानी पोहोचले. राजेश लाटकर यांची नाराजी दूर करण्यासाठी छत्रपती कुटुंबीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील सुद्धा उपस्थित होते.
षड्यंत्र रचून माझी उमेदवारी रद्द
यावेळी राजेश लाटकर यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न छत्रपती घराण्याकडून करण्यात आला. यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून माझी उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप केला. राजेश लाटकर यांची उमेदवारी अवघ्या काही तासांमध्ये रद्द करण्यात आल्यानंतर माघार न घेता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी चार नोव्हेंबर रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे मनधरणीसाठी आता थेट छत्रपती कुटुंबीय पोहोचल्याने राजेश लाटकर आपली उमेदवारी मागे घेणार का याकडे लक्ष असेल. दरम्यान, राजेश लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा प्रभाग असलेल्या कदमवाडी, सदर बाजार परिसरातून शाहू महाराजांना मताधिक्य दिले होते. त्यामुळे राजेश लाटकर यांची मोठी व्होट बँक त्या भागामध्ये असल्याने काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या?
दरम्यान, काल (3 ऑक्टोबर) शाहू महाराज यांनी सांगितले की, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं, त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती. जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेटा होता. त्यामुळे आम्हाला मधुरीमाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले. दरम्यान, आमदार जयश्री जाधव यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जयश्री जाधव ह्या या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही.
राज्यात किती जागा येणार हे सांगण्यास मी काय ज्योतिषी नाही. त्यामुळे किती जागा येणार याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सगळं चांगलं होईल यात काय प्रश्न नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ हा कोल्हापुरातून होतो, त्यामुळेच आपल्या जिल्ह्याचे महत्व महारष्ट्राला कळालं असल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या