Maharashtra Election Results 2019 Live Updates : मनसेची आघाडीवर आगपाखड
LIVE
Background
मुंबई : 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
देशात पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार असल्याने अंतिम निकाल लागण्यासाठी गुरुवारची मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता असली तरी निकालाचा कल दुपारपर्यंत समोर येईल.
बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवलेल्या अंदाजांमुळे भाजप आणि रालोआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-रालोआने दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतण्याची जय्यत तयारी केली आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये एकूण 60.80 टक्के मतदान झालं. म्हणजेच एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 592 मतदारांपैकी 5 कोटी 38 लाख 45 हजार 197 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची मोजणी कशी होणार?
लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल. यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.
चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटचा एका मशिनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदानाची आकडेवारी
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात जागांसाठी 63.04 टक्के मतदान झालं.
गडचिरोलीत सर्वाधिक 71.98 टक्के तर नागपूरमध्ये सर्वात कमी 54.74 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 1 कोटी 30 लाख 35 हजार 335 मतदारांपैकी 82 लाख 17 हजार 609 मतदारांनी आपला हक्क बजावला
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर हे 10 मतदारसंघ होते. इथे 62.88 टक्के मतदान झालं.
हिंगोलीत सर्वाधिक 66.52 तर सोलापुरात सर्वात कमी 58.45 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार 472 मतदारांपैकी 1 कोटी 16 लाख 61 हजार 830 मतदारांनी आपला हक्क बजावला
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले हे 14 मतदारासंघ होते. या जागांवर 62.36 टक्के मतदानाची नोंद झाली.
कोल्हापुरात सर्वाधिक 70.70 टक्के मतदानाची नोंद झाली तर पुण्यात सर्वात कमी 49.84 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 945 मतदारांपैकी 1 कोटी 60 लाख 81 हजार 856 मतदारांनी मतदान केलं.
चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 जागांसाठी 57.33 टक्के मतदान झालं.
नंदुरबारमध्ये सर्वाधिक 68.33 टक्के मतदानाची नोंद झाली तर कल्याणमध्ये सर्वात कमी 45.28 टक्के मतदानाची नोंद. या टप्प्यात 3 कोटी 11 लाख 92 हजार 840 मतदारांपैकी 1 कोटी 78 लाख 83 हजार 902 मतदारांनी आपला हक्क बजावला.
6 मे, पाचवा टप्पा : 7 राज्यात 51 मतदारसंघासाठी 64.16 टक्के मतदान झालं
12 मे सहावा टप्पा : 7 राज्यात 59 जागांसाठी 64.58 टक्के मतदान झालं
19 मे सातवा टप्पा : 8 राज्यात 59 जागांसाठी 65.16 टक्के मतदान झालं