Nagpur : सोने तस्करीसाठी अनोखी शक्कल, कॉफी मेकर मशिनमधून आणले दोन कोटी रुपयांचे सोने
Nagpur Gold Smuggling News : शारजाहून नागपूरला आलेल्या एका प्रवाशाने साडे तीन किलो सोन्याचे दोन गोळे लपवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यात आली आहे.

नागपूर: सीमाशुल्क विभागाने सोने तस्करीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड करत दोन कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने नागपूरच्या (Nagpur) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली आहे. तस्करी करणाऱ्या आरोपीने कॉफी मेकरमधून (Coffee Maker Mashine) दोन कोटी रुपयांचे तब्बल साडे तीन किलो सोने लपवून आणले होते.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद नावाच्या आरोपीने कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी 1748 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोळे (एकूण वजन 3 किलो 497 ग्राम सोने ) लपवून आणले होते. नागपूर विमानतळावर मोहम्मद अहमद या प्रवशावर संशय आल्याने त्याला थांबवण्यात आले. तो शारजाहून एअर अरेबियाच्या फ्लाइट क्र. G9-415 ने पहाटे 4:10 वाजता नागपूर विमानतळावर आला होता.
मोहम्मद अहमद मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून जेव्हा त्याला थांबण्यात आले, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्या जवळ असलेल्या कॉफी मेकर मशिनची तपासणी केली असता त्यात 1748 ग्रॅम वजनाचे दोन दंडगोलाकार आकाराचे सोन्याचे दोन गोळे आढळून आले. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी मोहम्मद अहमदला अटक केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे.
दहा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मध्यपूर्व आशियामधून आलेल्या दोन प्रवाशांकडून कॅप्सूलमध्ये पेस्टच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सोनं आढळून आलं होतं. त्यामुळे नागपूर सोने तस्करीसाठी एक नवा मार्ग बनत चालला आहे का असा संशय निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
