पोटच्या मुलांनीच घेतला आईचा जीव, लग्नाला विरोध केल्यामुळं भाऊ अन् मैत्रिणीसह आईला संपवलं
Mumbai Crime News : लग्नाला विरोध करत असल्याच्या रागातून दोन मुलांनी मैत्रिणीसह आपल्या आईचा जीव घेतलाय.
Mumbai Crime News : मुंबईतील वडाळा पोलिसांनी 42 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये मृत महिलेच्या दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांना तपासादरम्यान असं आढळून आलं की, पीडिता तिचा मुलगा आणि त्याच्या मैत्रिणीचं नातं तोडण्यासाठी आध्यात्मिक आणि काळी जादू करत होती.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला निर्मला विजय ठाकूर यांना दोन मुलं. त्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या होत्या. त्या काळी जादू करून घरातील लोकांवर करनी करून त्यांचा मुलगा आणि त्याच्या मैत्रिणीचं लग्न मोडण्यासाठी सतत प्रयत्न करत होत्या. त्यांचा मुलगा अक्षय विजय ठाकूर (वय 25) आणि त्याची मैत्रिण कोमल दत्तात्रय भोईंकर (वय 22) या दोघांच्या लग्नाला विरोध करत होत्या. त्यामुळेच मुलगा अक्षय आणि त्याचा लहान भाऊ म्हणजेच, मयत महिलेचा लहान मुलगा आणि अक्षयची मैत्रिण कोमल यांनी निर्मला यांच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार केले. या हल्ल्यात निर्मला गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईतील वडाळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळा पोलीस ठाणे हद्दीत आनंदवाडी, कोरबा मिठागार येथे एका घरामध्ये निर्मला या राहत होत्या. शनिवारी त्या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या कानाच्या खाली मानेजवळ धारधार शास्त्रानं वार करण्यात आले असून अंगावर इतर ठिकाणी जखमाही होत्या.
मृत महिलेचे पती विजय गजानन ठाकूर हे सिक्युरिटीमध्ये कामाला असून रात्री 1 वाजता कामाला गेले होते आणि शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांना निर्मला घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांना तात्काळ घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत चौकशी सुरु केली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. तसेच, खबरींना पाचारण केलं. त्यामध्ये काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि त्यानंतर मृत महिलेच्या पोटच्याच मुलांनी आपल्या मैत्रिणीसोबत तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांनी तिन्ही आरोपींकडे चौकशी केली असता, घटना घडली त्यावेळी ते लोणावळ्याला गेल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन चेक केलं असता ते तिघंही खोटं बोलत असल्याचं निष्पन्न झालं. आईनं लग्नाला विरोध केला म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं आरोपींनी सांगितलं. तसेच, मृत महिलेचा अल्पवयीन मुलानं आई त्रास द्यायची, महिनाभर जेवण देत नव्हती म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं.