उपराजधानी हादरली! तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात
Nagpur Crime News : तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात. नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक.
Nagpur Crime News : नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या आरोपींनी पोलिसांना त्यांच्या अन्य साथिदारांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन आरोपींनाही अटक केली आहे. यातील आरोपी रामसिंह मीणा हा रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर, 23 वर्षांचा कुश माळी हा आरोपी पोलीस कर्मचार्याचा मुलगा आहे. या ड्रग्ज तस्कारी प्रकरणात पोलिसांचा सहभाग समोर आल्यानं नागपुरात आता एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिशाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील दोन गुंडांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नागपुरातील काही तरुणींचा फक्त अमली पदार्थांच्या तस्करीत वापर होत नाही, तर एक दुसरी टोळी त्यांचा छळही करत असल्याचं व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. तर तरुणींचा लैंगिक छळ करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पाहा व्हिडीओ : तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं पोलीस कनेक्शन, तिघांना अटक
"माझ्या गर्लफ्रेंडचं (नेपाळी) नाक कोणी फोडलं. कुठं भेटतो? येतो तुझ्या एरियामध्ये. सांग माझ्या गर्लफ्रेंडचं (नेपाळी) नाक कोणी फोडलं" नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या आणि एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या टोळ्यांमधील दोन गुंडांनी अशा पद्धतीनं फोनवर एकमेकांना धमकावलं आणि त्यांच्या फोन कॉलची ऑडिओ रिकॉर्डिंग व्हायरल होत पोलिसांपर्यंत पोहोचली. या फोन कॉलमध्ये धमकी देणारा अभिषेक पांडे नावाचा गुंड केटरिंगच्या व्यवसायाच्या नावानं नागपुरातील तरुणींना ओडिशामधील संबळपूरला न्यायचा आणि तिथून पार्टीच्या प्रवासात तरुणींच्या बॅगमध्ये अंमली पदार्थांची तस्करी नागपुरात करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, याच ऑडिओ क्लिपमधून समोर आलेली दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, अभिषेक पांडे सोबत ओडिशामधून अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या काही तरुणींना दत्तू नावाच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारानं लक्ष्मी नावाच्या हॉटेलमध्ये नेऊन मारहाण केली होती. तसेच काही तरुणींचं लैंगिक छळही केले होते. त्यात हॉटेल मालकाचा ही सहभाग होता. ऑडिओ क्लिपमधून अनेकांकडून तरुणींच्या लैंगिक छळाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेत तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
नागपुरात आधीच मार्च महिन्यात हत्येच्या 11 घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. आता दोन गुन्हेगारांच्या एकमेकांना धमकावण्याच्या ऑडिओ क्लिपमुळे नागपुरात गुंड कोणाला ही घाबरत नाही. पोलिसांचा त्यांच्यावर वचक नाही, हे अधोरेखित झालं आहे.