EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
ज्यांचं ईपीएफ खातं आधारशी जोडलेलं (e-KYC) आहे, ते सदस्य विनाआधार ओटीपीच्या सहाय्यानं ईपीएफ हस्तांतर दावे ऑनलाइन दाखल करू शकणार आहेत.
EPFO: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. आता पीएफ सदस्यांना त्यांच्या नावात, जन्मतारखेत आणि इतर वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल करण्यासाठी कंपनीच्या किंवा ईपीएफओच्या पडताळणीची गरज राहणार नाही. ईपीएफओच्या पोर्टलवरून पीफ खाते असणाऱ्या कोणत्याही सदस्याला घरबसल्या आपल्या वैयक्तिक तपशीलांमध्ये बदल करता येणार आहेत. शनिवारपासून (18 जानेवारी) या सुविधेचा शुभारंभ झाला असून, 7.6 कोटी सदस्यांना या नव्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय, ज्यांचं ईपीएफ खातं आधारशी जोडलेलं (e-KYC) आहे, ते सदस्य विनाआधार ओटीपीच्या सहाय्यानं ईपीएफ हस्तांतर दावे ऑनलाइन दाखल करू शकणार आहेत. कंपनीच्या हस्तक्षेपाची गरज न लागल्याने ही प्रक्रिया आणखी सोपी होणार असल्याचं शनिवारी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. "ईपीएफओकडे दाखल होणाऱ्या 27% तक्रारी केवायसी/प्रोफाइल अपडेटशी संबंधित असतात. या नव्या सुविधेमुळे या प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कमी होतील. असंही त्यांनी सांगितलं.यामुळे सदस्यांना अनावश्यक प्रक्रियेत वेळ घालवावा लागणार नाही. पूर्वी नियोक्त्यांना अशा दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सरासरी 12 ते 13 दिवस लागायचे. पण आता, प्रक्रिया जलद होऊन वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
काय बदल करता येणार?
ईपीएफओने वैयक्तिक तपशील सुधारण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे. ईपीएफओ पोर्टलवरून, सदस्यांना आता कोणत्याही नियोक्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या प्रोफाइलमधील चुका दुरुस्त करता येतील. यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचे/आईचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, सामील होण्याची तारीख आणि सोडण्याची तारीख यांसारखे महत्त्वाचे तपशील अपडेट करता येणार आहेत.
कोणाला घेता येणार लाभ?
यूएएन क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 नंतर जारी झालेला असेल, तर सदस्यांना ही सेवा वापरता येईल.
2017 आधीच्या यूएएनसाठी कंपनीलाच तपशील अपडेट करता येईल, मात्र यासाठीची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.
आधारशी न जोडलेल्या यूएएनसाठी, फक्त दोन वेळा बदल करता येतील, आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना रोजगारदाता कंपनीशी संपर्क साधावा लागेल.