NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
NTPC Green Energy IPO: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. लिस्टिंगनंतर एनटीपीसी ग्रीनच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळतेय.
NTPC Green Energy IPO Listing मुंबई: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओवर बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टींग गेन फार थोड्या प्रमाणात मिळाला. कारण, प्रतिशेअर 108 इश्यू प्राइस असणाऱ्या एनटीपीसी ग्रीनचा आयपीओ लिस्ट होताना 111.50 रुपयांना प्रतिशेअर लिस्ट झाला म्हणजेच गुंतणूकदारांना 3.324 टक्के लिस्टिंग गेन मिळाला. एनटीपीसी ग्रीनच्या लिस्टींगनंतर गुंतवणूकारांकडून जोरदार खरेदी झाल्यानं शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली.एनटीपीसी ग्रीनच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं असून शेअर 122.65 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कंपनीकडून 10 हजार कोटींची उभारणी
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ 19 ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत खुला होता. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. 10 रुपयांच्या दर्शनी किंमतीच्या आधारे समभागाचं मूल्य निश्चित करण्यात आलं होतं. रिटेल गुंतवणूकदार किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रतिसादामुळं एनटीपीसी ग्रीनला आयपीओच्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपयांची उभारणी करता आली.
संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी निश्चित करण्यात आलेला कोटा 3.51 पट सबस्क्राइब कण्यात आला. रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा 3.59 पट सबस्क्राइब करण्यात आला. एनटीपीसी ग्रीनच्या आयपीओला एकूण 2.55 पट सबस्क्राइब करण्यात आला होता.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी च्या आयपीओमध्ये 138 शेअरचा एक लॉट होता. त्यासाठी 14904 रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. गुंतवणूकदारांना किमान 1 ते कमाल 13 लॉट खरेदी करता येणार होते. म्हणजेच एका गुंतवणूकदारांना 1794 शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आयपीओसाठी 5 रुपये प्रतिशेअर सूट देण्यात आली होती.
IPO आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल नव्हता
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून आयपीओच्या माध्यमातून नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या आयपीओमध्ये कोणत्याही प्रकारचे ऑफर फॉर सेलद्वारे शेअरची विक्री करण्यात आली नव्हती. सेबीकडे दिलेल्या डीआरएचपी नुसार एनटीपीसी ग्रीन 7500 कोटी रुपयांचा वापर कर्ज परतफेडीसाठी करणार आहे. याशिवाय इतर रक्कम कंपनीच्या कामासाठी वापरली जाईल. एनटीपीसी ग्रीन एनर्जी सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)