(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Retail Inflation : महागाईने दराने गाठला 15 महिन्यातील उच्चांक; जुलै महिन्यात 7.44 टक्के महागाई दर
Retail Inflation : जुलै महिन्यात महागाई दराने मोठी उसळण घेतली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील महागाईचा दर दुप्पटीने वाढला आहे.
Retail Inflation : टोमॅटोसह (Tomato Price Hike) खाद्य पदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) दरात वाढ झाली आहे. जुलै महिन्यातील महागाईने उसळण घेतली असून महागाई दर (Inflation Rate) हा 7 टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. जून 2023 मध्ये महागाई दर हा 4.81 इतका नोंदवण्यात आला होता. मात्र, जुलै महिन्यातील महागाई दराने आरबीआयने (RBI) निश्चित केलेल्या महागाई दराची सहनशील मर्यादा 6 टक्के इतकी आहे. मात्र, आकडेवारीनुसार, शहरी भागातील किरकोळ महागाई दर 7.63 टक्के इतका राहिला. तर, ग्रामीण भागात हा दर 7.20 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ
सांख्यिकी मंत्रालयाने किरकोळ महागाई दराबाबत डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, खाद्य पदार्थांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात खाद्य महागाई दर 11.51 टक्के इतका राहिला. जूनमध्ये हा दर 4.49 टक्के इतका नोंदवण्यात आला. याचाच अर्थ एकाच महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाई दरात दुप्पट वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2020 नंतर हा महागाई दराचा उच्चांक आहे.
भाजीपाल्याच्या महागाई दरात मोठी उसळण
जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 37.34 टक्के होता. जून 2023 मध्ये हा दर उणे 0.93 टक्के होता. याचाच अर्थ एका महिन्यात पालेभाज्या आणि भाज्यांच्या महागाई दरात 38 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डाळींच्या महागाईचा दर 13.27 टक्के इतका आहे. जूनमध्ये 10.53 टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर 21.53 टक्के आहे, हा महागाई दर जूनमध्ये 19.19 टक्के होता. दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर 8.34 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. जूनमध्ये 8.56 टक्के इतका नोंदवण्यात आला. अन्नधान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर 13.04 टक्के आहे. जूनमध्ये 12.71 टक्के होता.
महागड्या ईएमआयमधून दिलासा नाहीच!
गेल्या वर्षी मे 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतरच, RBI ने पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केली. रेपो दर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला. मे 2023 मध्ये, जेव्हा किरकोळ महागाई दर 4.25 टक्क्यांवर आला तेव्हा महागड्या EMI मधून दिलासा मिळण्याची आशा होती. पण पुन्हा किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेल्याने महागड्या ईएमआयमधून दिलासा मिळण्याची आशा काही काळासाठी मावळली आहे.