(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्राची आपल्या कर्मचाऱ्यांना तंबी! काम करताना आळशीपणा केल्यास होणार कठोर कारवाई
आपल्या कर्मचाऱ्यांमधील आळशीपणा घालवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
नवी दिल्ली : सरकारी काम आणखी दोन दिवस थांब असं उपहासानं सर्रास म्हटलं जातं. वेगवेगळ्या विभगात काम करणारे सरकारने नोकरही उत्स्फूर्ततेने काम करत नाही, असा आरोप नेहमीच केला जातो. याच मुद्द्याला घेऊन सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांच्यात वाद झाल्याचेही प्रकार अनेकवेळा समोर आले आहेत. पण आता शासकीय पातळीवर कामाची प्रगती वाढावी यासाठी केंद्र सरकारने मोठं पाउल उचललं आहे. कर्मचाऱ्यांमधील आळशीपणा घालवण्यासाठी केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
कर्मचारी उशिरा येतात आणि लवकर जातात
एखादा कर्मचारी कामावर सतत उशिरा येत असेल किंवा कामाचे तास संपण्याआधीच कार्यालयातून जात असेल तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. गेल्या काही काळापासून आपले कर्मचारी आपली बायोमॅट्रिक हजेरी लावत नाहीत. तसेच काही कर्मचारी कार्यालयात उशिराने येतात आणि लवकर घरी जातात, हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
बायमेट्रिक मशीन चालू राहील याची खात्री करा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामावर आल्यानंतर उपस्थिती लावण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित बायोमॅट्रिक अटेन्डन्स सिस्टिम (AEBAS) आहे. मात्र अनेक कर्मचारी या पद्धतीने आपली उपस्थिती लावत नाहीत. हे निदर्शनास आल्यानंतर सरकारने आपल्या विभागांना कडक सूचना दिल्या आहेत. सर्व कर्मचारी AEBAS च्या मदतीनेच आपली उपस्थिती दर्शवतील याची खात्री करावी. सर्व शासकीय विभाग तसेच मंत्रालयातील कार्यालये यातील बायमेट्रिक मशीन नेहमी चालू राहायला हवी, असे निर्देशही केंद्राने आपल्या विभागांना दिले आहेत.
कर्मचाऱ्यांनी वेळेत यावे आणि प्रामाणिकपणे काम करावे यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाने एक फेस ऑथेंटिकेशन सिस्टिम लागू करण्यास सूचवले आहे. या यंत्रणेत लाईव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंगची सुविधा आहे. विशेष म्हणजे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची बदली, एखादी महत्त्वाची जबाबदारी देणे, पोस्टिंग आदी गोष्टी करताना संबंधित कर्मचारी ऑफिसला वेळेवर येतो का, वेळेआधीच कार्यालयातून बाहेर पडतो का, आदी बाबींचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे आता केंद्राच्या वेगवेगळ्या विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
हेही वाचा :
आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा उभी राहू शकते मोठी अडचण!
Assessment Year आणि Financial Year म्हणजे नेमकं काय? त्याचा आयटीआरशी संबंध काय? जाणून घ्या!
शेअरचे मूल्य 2 रुपयांपेक्षा कमी, पण एका आठवड्यात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीचा जलवा