एक्स्प्लोर
Advertisement
ब्लॉग : पोलीस 10 लाख, IAS 1 कोटी, मराठवाड्यातील हुंड्याचं रेटकार्ड
हुंड्याचं लोण हे केवळ मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात पसरलंय. ही आजची परिस्थिती नाही, गेल्या कित्येक दिवसांपासून चालत आलंय. मात्र मुलीला द्यायला हुंडा नसल्याने बापाला, मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली तेव्हा या विषयाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
मराठवाड्यातला चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा शेतकरी, मुलीचं लग्न करण्यासाठीही पैसा नसल्याने उद्विग्न झालेला बाप आणि आपल्या बापावरील ओझं कमी करण्यासाठी जगाचा निरोप घेणारी मुलगी... या परिस्थितीला हुंडा ही अनिष्ट प्रथा तेवढीच जबाबदार आहे.
आर्थिक अडचण असली की मुलाचा बाप मुलाचं लग्न करण्याचं ठरवतो. मुलगा टवाळक्या करत फिरणारा असेल तरीही त्याला किमान दोन लाख तरी हुंडा मिळतोच, ही त्यामागची धारणा असते. काही जण फक्त हुंडा देण्याच्या अटीवरच लग्न करण्यासाठी तयार होतात, तर काही जण बोलणी करताना द्या इच्छेने म्हणतात. यांच्या 'इच्छा' या शब्दाची ठराविक व्याख्या नाही. स्वेच्छेने मुलीचा बाप 2 लाख म्हणाला, तर यांचं उत्तर येतं 2 लाखात काय होतंय. मग इथूनच आणखी रक्कम वाढवण्याची बोली लागते. मुलाकडून गावातल्या सोबत असणाऱ्या दोन चार जणांकडून बोली वाढवण्याचं काम केलं जातं. स्थळ आवडलं असेल, मुलीचं चांगलं होईल, सावलीत रहावं लागेल, अशी परिस्थिती असेल तर मुलीचा बाप फार विचार करत नाही. वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतो. मात्र मागितेलेली रक्कम मान्य करतो.
हुंडा घेण्यासाठीही प्रत्येक मुलाचे दर ठरलेले आहेत. सुशिक्षित असो, किंवा बेरोजगार असो, प्रत्येकाला हुंडा हवा असतो. काही जण आई-वडिलांना पुढे करतात, तर काही जण स्वतः मागणी करतात. माझी नाही, पण आई-वडिलांची इच्छा आहे, त्यांच्यापुढे मी नाही, असं म्हणणारे 90 टक्के तरुण आपल्याला आढळतील. यामध्ये ऊस तोडणारा 1-2 लाख, पोलीस किंवा आर्मीत असणारा तरुण, चतुर्थ श्रेणीतील सरकारी कर्मचारी 5 लाख, घरी बागायती शेती असेल तर 10 लाख, वकील 5 ते 10 लाख, पीआय, पीएसआय, 15 ते 20 लाख, आयएएस 50 लाख ते 1 कोटी असे दर ठरलेले आहेत. हे रेट माहिती करुन घेण्यासाठी कुठल्याही सरकारी आकडेवारीची गरज नाही. मराठवाड्यातल्या कोणत्याही गावात गेलं तरी ज्याने मुलीचं लग्न केलंय तो माणूस तुम्हाला हे रेटकार्ड तोंडपाठ सांगेल.
काही जणांना हुंडा घ्यायचा नसतो, मग सोनं किंवा वस्तूंच्या माध्यमातून पैसा वसूल केला जातो. सरकारी नोकरदार असेल, तर असं बऱ्याचदा होतं. जबाबदार व्यक्ती म्हणून हुंडा तर घेऊ शकत नाही, पण आई-वडिलांची इच्छा म्हणून काही तरी द्या म्हणणारे अनेक जण आढळतात. कॅशलेस हुंडा घेणारे 10 ते 20 तोळे सोनं ( 3 ते 6 लाख रुपये) घेतात. महागड्या वस्तू देणं हा अलिखित नियम आहे. पोरीच्या बापाला फक्त हुंडा किंवा सोनं देऊन भागत नाही. लग्नात लागणारे शेकडो खर्च त्याला करावे लागतात. हे खर्च करता करता, त्याची शेतीही जाते, न झेपणारं कर्जाचं ओझं तयार होतं आणि मागे राहणाऱ्या मुलीचं किंवा मुलाचं भवितव्य शेतीवर अवलंबून असतं. पाऊस नाही आला तर त्या शेतकऱ्याला जीवन संपवण्याशिवाय पर्याय नसतो.
हुंडा देऊनही मुलीचा संसार सुरळीत होईल याची कुणीही हमी देत नाही. हुंडा दिल्यानंतर समाधानी होणाऱ्या मुलाचे अनेक आई-वडील आहेत. मात्र लाखो रुपये लग्नाला खर्च करुन एका वर्षाच्या आत संसार मोडलेले अनेक उदाहरणं आहेत. मुलीला होणारा त्रास हा वेगळाच असतो. सासरच्यांकडून कितीही त्रास दिला जात असला तरी मुलीचे आई-वडील तो सहन करायला लावतात. लाखोंचं कर्ज काढून लग्न करुन दिलंय, त्यात मुलीचं नांदणं मोडलं तर तिला कसं सांभाळणार, समाज काय म्हणेल, याची चिंता त्या मुलीच्या बापाला असते.
हुंड्याला मानसिक प्रवृत्तीही तेवढीच जबाबदार आहे. माझ्या मुलीला दिलाय, मग मुलाचा हुंडा का सोडायचा हा विचार फार रुजलेला आहे. त्यातूनच जास्तीत जास्त हुंडा घेण्याची स्पर्धा लागते. जास्त हुंडा देणं काही जण अभिमानाची बाबही समजतात. पण या परंपरेत गरीब माणूस भरडला जातो.
ग्रामीण भागात मुलगी सांभाळणं हे आई-वडीलांसाठी सर्वात मोठं जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न करुन जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आई-वडीलांचा असतो. पण मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढून जो लग्नात करायचाय, तो तिच्या शिक्षणावर केला तर मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही का? मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल, तर तिला हुंडा मागण्याची हिंमतही कुणी करणार नाही. त्यातही मागणारे सापडतीलच, पण त्यांना उत्तर द्यायला मुलगी समर्थ असेल. आजही ग्रामीण भागात मुलीला शिकवणं प्रत्येक पालकाला शक्य होत नाही. पण प्रयत्न करणं हे कुणालाही अशक्य नाही. मुलगी स्वतःच्या पायावर ज्या दिवशी उभी राहिल, त्या दिवशी हुंडा समाजातून बंद नाही, पण निदान कमी होईल.
हुंडा घेणं हा मुलाच्या आई-वडीलांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. किती हुंडा घेतला हे आज अभिमानाने सांगितलं जातं. हुंडा हा प्रतिष्ठेचा विषय ज्या दिवशी राहणार नाही, त्यादिवशी हुंडा बंद होईल. मी हुंडा घेतलाय, हे सांगताना लाज वाटेल, तेव्हा हुंडा बंद होईल. सद्य परिस्थितीत हुंडा न घेणारेही आढळतात. पण त्याची उलट टिंगल केली जाते. एवढ्या दिवस पोरगा सांभाळून काहीच मिळालं नाही, म्हणून तो चर्चेचा विषय बनतो. सरकारी कायदे, शिक्षण किंवा इतर काहीही करुन हुंडा बंद करता येणार नाही. हुंडा घेण्यामागची प्रतिष्ठा समाजाला एकत्र येऊन संपवावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement