एक्स्प्लोर
Advertisement
मेजर ध्यानचंद : एक होता जादूगार
काही लोकं असतातच अशी. जन्मजात कौंतेय कर्णासारखी अपराजीत.. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या तेजापुढे बड्याबड्या रथी-महारथींची किर्तीही धुसर होते. असाच एक तारा ब्रिटिशकालीन भारतात जन्माला आला. जो पुढे हॉकीचा जादूगार म्हणून ओळखला जाऊ लागला.. नाव होतं ध्यान सिंग..... उर्फ ध्यानचंद
हजारों साल नर्गिस अपनी बेनुँरी पे रोती है.
बडी मुश्किल से होता है, चमन मे दिदावर पैदा..
- अल्लामा इकबाल
काही लोकं असतातच अशी. जन्मजात कौंतेय कर्णासारखी अपराजीत.. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या तेजापुढे बड्याबड्या रथी-महारथींची किर्तीही धुसर होते. असाच एक तारा ब्रिटिशकालीन भारतात जन्माला आला. जो पुढे हॉकीचा जादूगार म्हणून ओळखला जाऊ लागला.. नाव होतं ध्यान सिंग..... उर्फ ध्यानचंद
29 ऑगस्ट 1905ला ध्यानसिंग यांचा अलाहाबादमध्ये जन्म झाला... वडील सामेश्वरसिंग सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं.. त्यामुळे ध्यानसिंग यांना जास्त शिकता नाही आलं. सहा वर्षे शाळा नावाचं जग अनुभवल्यानंतर, वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी सैन्यात नोकरी पत्करली. 16 व्या वर्षी दिल्लीतल्या ब्राम्हण रेजिमेन्टमध्ये ध्यानचंद रुजू झाले.. त्यानंतर त्यांचं कुटुंब झाशीमध्य़ेच स्थायिक झालं. पैलवान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरूवातीच्या काळात हॉकीबद्दल फारसं आकर्षण नव्हतं.. पण सैन्यदलात रंगणाऱ्या हॉकीच्या सामन्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली. तत्कालिन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंगच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि याच हॉकी स्टिकनं पुढे ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवलं. काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या प्रकाशात हॉकीची प्रॅक्टिस करत. याच साधनेमुळं लोकं त्यांना ध्यानसिंगऐवजी ध्यानचंद नाव पडलं.
1926 साली भारतीय सैन्यदलाच्या हॉकी टीमचा पहिला विदेश दौरा ठरला. यासाठी खेळाडूंची शोधाशोध सुरू झाली. भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, अशी ध्यानचंद यांची मनोमन इच्छा होती. कमांडिंग ऑफिसरनं भारतीय संघात सामील होण्यासाठी ध्यानचंद यांना बोलावून घेतलं. कमांडिंग ऑफिसरनं दिलेल्या आदेशानं ध्यानचंद यांची स्वप्नपूर्ती झाली होती. वयाच्या 21 व्या वर्षी ध्यानचंद परदेश दौऱ्यावर निघाले होते.
1926 मध्ये मध्ये ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाचा हॉकी संघ न्यूझीलंडमध्ये जाणार होता. पहिलाच परदेश दौरा आणि संपूर्ण हॉकी विश्वाला चक्रावून सोडणारा अभूतपूर्व पराक्रम. 21 सामन्यांपैकी 18 सामन्यांत सैन्यदलाच्या संघानं विजय मिळवला.
संपूर्ण दौऱ्यात त्यांनी 192 गोल केले. त्यातले शंभरएक गोल फक्त ध्यानचंद यांच्या नावावर होते. या भीमपराक्रमानं अवघ्या क्रीडाविश्वाची नजर यांच्यावर पडली.
न्यूझीलंडवरून परत आलेल्या भारतीय हॉकी संघाच्या स्वागताला ढोल ताशांचा कडकडाट झाला. ध्यानचंद यांना शिपाईपदावरून थेट लान्स नायक पदावर बढती मिळाली आणि इथूनच ध्यानचंद यांच्या जादूई खेळाची सुरूवात झाली.
त्यानंतर 1928 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये आपल्याच घरात गुलाम राष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागेल असं ब्रिटनला कधी स्वप्नातही वाटलं नसेल.
ऑलिम्पिकच्या आधी फॉल्कस्टोन फेस्टिव्हलमध्ये भारतीय संघ आणि ब्रिटनचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतानं ब्रिटनला 11 सामन्यांमध्ये हरवलं. आपल्या गुलाम राष्ट्राकडून झालेला हा पराभव ब्रिटनच्या जिव्हारी लागला.
त्यानंतर ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भारतानं ऑस्ट्रियाला 6-0, बेल्जियमला 9-0, स्वित्झर्लंडला 6-0, डेनमार्कला 5-0 आणि नेदरलॅन्डला 3-0 हरवत हॉकीच्या पहिल्या सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं गेलं.
1928 मध्ये सुवर्णपदक घेऊन आलेल्या भारतीय संघाला, विशेषतः हॉकीच्या जादुगाराला पाहण्यासाठी मुंबई डॉकयार्डवर हजारो लोकांनी गर्दी केली होती.. पेशावरपासून केरळपर्यंतच्या हजारो लोकांना फक्त ध्यानचंद यांना पाहायचं होतं. त्यादिवशी तब्बल 24 तास जहाजांची ये जा बंद होती. भारतात हे सगळं पहिल्यांदा घडत होतं.
आतापर्यंत ध्यानचंद हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. 1928 मध्येच ध्यानचंद यांची बदली आजच्या पाकिस्तानमधील, वजिरीस्तानमध्ये करण्यात आली. पहाडीप्रदेश असल्यानं तिथे हॉकी खेळणं जवळपास असंभव होतं. पण तरीही 1932 सालच्या ऑलिम्पिकसाठीच्या हॉकी संघात ध्यानचंद यांचं नाव अग्रभागी होतं. संघाचा सराव व्हावा यासाठी दोन सराव सामने खेळण्यासाठी भारतीय हॉकी संघ सिलोनमध्ये म्हणजे आताच्या श्रीलंकेत पाठवण्यात आला.
सिलोनमध्ये गेलेल्या भारतीय संघानं पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 20-0 आणि दुसऱ्या सामन्यात 10-0 अशी मात दिली. या तीस गोलमध्ये निम्म्यापैकी जास्त गोल एकट्या ध्यानचंद यांच्या नावावर होते. आता भारतीय हॉकी संघासमोर 1932च्या लॉस एन्जिलिस ऑलिम्पिकचं आव्हान होतं. तब्बल 17 दिवसांचा समुद्रातून प्रवास करत भारतीय संघ लॉस एन्जिलिसला पोहोचला.
ऑलिम्पिकमध्ये जपानला ११-१ अशी मात देऊन भारतानं अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम सामना ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेशी होणार होता. भारतानं २४ गोल करत अमेरिकेचा अक्षरशः धुव्वा उडवला. यात 8 गोल ध्यानचंद यांचे होते. त्या सामन्यात ध्यानचंद यांच्यापेक्षा जास्त गोल करणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा धाकटा बंधू रूपसिंग होता. रूप सिंगनं तब्बल १० गोल केले. रुपसिंग यांनी ध्यानचंद यांचा खेळापासून प्रभावित होऊन हॉकी खेळायला सुरूवात केली होती.
1932 साली भारतीय हॉकी संघानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं. आता ध्यानचंद प्रमाणेच, त्यांचे बंधू रुप सिंग यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोन सामन्यात भारतानं एकूण 35 गोल केले. त्यात रुप सिंग आणि ध्यानचंद या दोघांचे 25 गोल होते.
1932 ते 1936 या चार वर्षात भारतीय हॉकी संघानं 37 सामने खेळले. त्यात 34 सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय हॉकी संघाचा आणि ध्यानचंद यांचा दबदबा तयार झाला होता.
ध्यानचंद असा खेळ करायचे की चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून राहायचा. हॉलंडमध्ये तर त्यात चुंबक असल्याची शंका उपस्थित करून हॉकी स्टिक तोडूनही बघितली.
ध्यानचंद यांचे क्रिकेटमहर्षी सर डॉन ब्रॅडमन हे सुद्धा फॅन बनले होते.
1935 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी क्रिकेटमहर्षी सर डॉन ब्रॅडमन हे स्वतः अॅमस्टरडॅममधला सामना बघण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी ब्रॅडमन ध्यानचंद यांचा खेळ पाहून प्रभावित झाले. या दौऱ्यात ध्यानचंद यांनी 48 सामन्यात 201 गोल केले. हे हॉकी प्लेयर चे गोल आहेत की क्रिकेटप्लेयरचे रन आहेत, अशा शब्दात आश्चर्य व्यक्त करत ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांचं कौतुक केलं.
आणि आता अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं... 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिककडे. भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व स्वत: ध्यानचंद यांच्याकडे होतं. याच बर्लिनमध्ये ध्यानचंद यांनी असा इतिहास घडवला ज्यामुळे आपली मान अभिमानानं उंचावते.
जर्मनीतलं बर्लिन शहर एखाद्या नववधूसारखं सजलेलं. जगातला सर्वात मोठा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर स्वतः या ऑलिम्पिक सामन्यांवर नजर ठेऊन होता. अवघ्या जगाचं लक्ष बर्लिनकडे आणि बर्लिनचं लक्ष ध्यानचंद यांच्याकडे. कारण जर्मन प्रसारमाध्यमात फक्त ध्यानचंद यांच्याच नावाची चर्चा होती. हे पहिलं ऑलिम्पिक होती ज्यांचं चित्रिकरण करण्यात आलं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं जबरदस्त खेळ केला. हंगेरीला 4-0, अमेरिकेला 7-0, जपानला 9-0 आणि सेमीफायनलमध्ये फ्रान्सला 10-0 ने मात दिली... आणि एकही गोल न खाता फायनलमध्ये धडक मारली.
`The Olympic complex now has a magic show too.'
`Visit the hockey stadium to watch the Indian magician Dhyan Chand in action.'
अशा हेडलाईन्स जर्मनीच्या वृत्तपत्रांमध्ये छापल्या जात होत्या. अपेक्षेप्रमाणं जर्मनी फायनलमध्ये भारतीय संघाची वाटच पाहात होता. अंतिम सामना बघण्यासाठी खुद्द हिटलर उपस्थित होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दडपण जाणवत होतं. सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मॅनेजर पंकज गुप्ता यांनी सर्व खेळाडूंना ड्रेसिंगरुममध्ये बोलावलं.
आपल्या बॅगेतून त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाचा तिरंगा काढला. सर्वांना तिरंग्याची शपथ देत हिटलरचं दडपण घेऊ नका, निर्भेळ खेळ करा, असा सल्ला दिला. ज्या दिवशी हा अंतिम सामना होता, ती तारीख होती 15 ऑगस्ट 1936. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या बरोबर 11 वर्ष आधी, ध्यानचंद आणि त्यांच्या नेतृत्वातल्या टीमनं आपल्या मनात तिरंगा फडकवला.
अखेर भारतीय संघ ध्यान चंद यांच्या नेतृत्वात मैदानावर उतरला. काही मिनिटातच ध्यानचंद यांनी गोल करायला सुरूवात केली. जर्मनीची दाणादाण उडालेली पाहून हिटलरनं मैदानातून काढता पाय घेतला. भारतानं हा सामना 8-1 नं जिंकला. ध्यानचंद यांच्या जादुई खेळीमुळं भारतानं सुवर्णपदकाची हॅटट्रिक मारली.
पण खरी गंमत पुढे होती सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 16 ऑगस्टला बक्षीस वितरण होणार होतं आणि तेही खुद्द हिटलरच्या हस्ते. विजयानंतरच्या रात्री ध्यानचंद यांना झोप लागली नाही. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट छापलं जात होतं. हिटलर ध्यानचंद यांना भेटल्यावर काय बोलणार याची चर्चा सगळीकडे सुरू होती.
अखेर तो दिवस आलाच... गंभीर स्वभावाच्या हिटलरनं ध्यानचंद यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. वरुन खालपर्यंत न्याहाळत असताना हिटलरची नजर ध्यानचंद यांच्या फाटलेल्या बुटातून बाहेर आलेल्या अंगठ्याकडे स्थिरावली.
"काय करतोस भारतात?" हिटलर नजर रोखून बोलला...
"सैन्यदलाच्या सेवेत आहे..." ध्यानचंद धडधडत्या छातीतून शब्द बाहेर काढत बोलले.
सैन्य म्हणताच हिटलरनं पुन्हा ध्यानचंद यांच्या पाठीवर थाप दिली.
"काय करतोस सैन्यदलात?" हिटलरनं पुन्हा प्रश्न केला.
"पंजाब रेजिमेन्टमध्ये लान्स नायक आहे..." ध्यानचंद उत्तरले.
"जर्मनीत ये.. जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यात कर्नलपद देतो तुला.." हिटलरनं ध्यानचंद यांना ऑफर दिली.
"नाही.. पंजाब रेजिमेन्टवर मला गर्व आहे.. आणि भारत भूमीचा मला अभिमान आहे.." असं बोलत ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर क्षणात धुडकावली.
"जशी तुझी इच्छा....." असं म्हणत सुवर्णपदक ध्यानचंद यांना देत हिटलरनं पाठ वळवली आणि मैदानातून निघून गेला. ध्यानचंद यांच्या जिवात जीव आला.
हिटलरची ऑफर नाकारल्यानं ध्यानचंद यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ज्या हिटलरसमोर उभं राहण्याची हिम्मत कोणी करत नव्हतं. अशा वेळी त्याला नकार दिल्यानं ध्यानचंद यांचं कर्तृत्व उंचावलं होतं.
1937 साली ध्यानचंद यांना लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. त्यानंतर त्यांची बदली होत राहिली. 1937 - 1945 पर्यंत दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे याकाळात फारसे सामने होऊ शकले नाही. मात्र 1945 साली ध्यानचंद यांनी चाळीशी पूर्ण केल्याचं कारण देत, हॉकीतून सं न्यास घेण्याचं ठरवलं. मात्र देशप्रेमाखातर ते पुढही काही वर्ष खेळतंच राहिले.
लेफ्टनंटपदानंतर ध्यानचंद यांना कॅप्टन आणि शेवटी मेजरपद देण्यात आलं.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
यावर्षी भारतीय हॉकी फेडरेशननं एशियन स्पोर्ट्स असोसिएशनकडे { ईस्ट आफ्रिकेला} सामने खेळू द्यावेत अशी विनंती केली. तेव्हा एशियन स्पोर्ट्स असोसिएशननं स्पष्ट शब्दात कळवलं की, ध्यानचंद खेळणार असतील तरच या. तेव्हा वयाच्या 42 व्या वर्षी ध्यानचंद यांनी संघाच्या खेळाडूंना एकत्र जोडलं. नोव्हेंबर 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या विभाजनाच्या आगीचा धूर निघत असताना ध्यानचंद यांनी आफ्रिकेत नेलेल्या संघात लाहोर, कराची, पेशावरचे खेळाडू होते. ध्यानचंद यांच्या प्रेमापोटी आणि कर्तृत्वासमोर द्वेषाच्या सीमारेषा गळून पडल्या.
आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आणि प्रथम दर्जा हॉकी सामन्यात 1000 पेक्षाही अधिक गोल करणाऱ्या ध्यानचंद यांना वयाच्या 51 व्या वर्षी 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ध्यानचंद यांचं चित्र असलेलं डाक तिकीटही सरकारनं छापलं. ऑस्ट्रियाच्या विएन्नामध्ये ध्यानचंद यांचा चारभुजाधारी पुतळा उभारण्यात आलाय ज्यात त्यांच्या चार हातात चार हॉकीस्टिक आहेत.
पण काळ बदलत गेला,. स्वातंत्र्यानंतर भारतानं हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला. मात्र भारतीयांच्या मनावर राज्य गाजवलं ते गोऱ्यांच्या क्रिकेटनंच. एक दोन नाही तर तब्बल तीन सुवर्ण पदकं मिळवून देणारे ध्यानचंद खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच भारतीयांच्या विस्मरणात गेले. हॉकीच्या मैदानावर भारताचा दबदबा कायम ठेवणाऱ्या या अवलियाला, आयुष्याच्या उत्तरार्धात खूप वेदना सहन कराव्या लागल्या.
3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ध्यानचंद यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार स्मशाणभूमीत न करता झांशीतल्या हॉकी मैदानावर करण्यात आले. ज्याठिकाणी ते तासंतास हॉकीचा सराव करायचे.
त्यांच्या पार्थिवावर दोन हॉकी स्टिक क्रॉस करून ठेवण्यात आल्या होत्या. मृत्यूपश्चातही या अवलियानं हॉकीस्टिक सोडलीच नाही.
काल परवापर्यंत ध्यान चंद यांना भारतरत्न द्यावं यासाठी चर्चा, वादविवाद झाले. पण सगळं हवेतंच विरलं. खरतंर हिमालयही खजील व्हावा एवढं उत्तुंग कर्तृत्व असलेल्या या महात्माला तुम्ही आपण काय भारतरत्न देणार. ध्यानचंद एका अढळ ताऱ्यासारखे आहेत. जोपर्यंत सूर्य आपलं कर्तव्य नियमानं बजावत राहिल, तोपर्यंत या ध्यानचंद्राची कीर्ती अशीच अबाधित राहिल. मग भलेही त्यांना कोणी भारतरत्न मानो वा ना मानो.
एक विचार करा.. आज एखादं कांस्यपदक किंवा रौप्यपदक मिळाल्यावर आपला उर अभिमानानं फुलतो. दिवसभर चर्चा रंगतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, टीव्ही, वृत्तपत्रांमधून देशप्रेम वाहू लागतं. ध्यानचंद यांच्या काळात हे सगळं असतं तर... तर काय त्यांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवा यासाठी चर्चा रंगल्या असत्या. मग या व्हर्चुअल जगात ध्यानचंद यांनी जन्म घेतला नाही यात त्यांची चूक झाली का? की आपण अजूनही कृतघ्न झालो आहोत.. विचार करण्याची गरजंय.
या खऱ्याखुऱ्या भारतरत्नाला सलाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement