वर्षभरात RBI ने केली 57.5 टन सोन्याची खरेदी, एवढं सोनं खरेदी करण्याचं कारण काय? नेमका किती आहे सोन्याचा साठा?
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आत्तापर्यंत 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 57.5 टन सोने खरेदी केले आहे. ज्यामुळं देशातील एकूण सोन्याचा साठा 879.6 टन झाला आहे.

Gold : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आत्तापर्यंत 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 57.5 टन सोने खरेदी केले आहे. ज्यामुळं देशातील एकूण सोन्याचा साठा 879.6 टन झाला आहे. ही खरेदी गेल्या सात वर्षांतील दुसरी सर्वात मोठी वार्षिक खरेदी मानली जात आहे. सोन्याकडे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, म्हणजेच अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे सोने. सर्वसामान्यांसोबतच आता रिझर्व्ह बँकही सोन्याचा साठा वाढवत आहे.
आरबीआय वारंवार सोन्याची खरेदी का करत आहे?
आपल्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये विविधता आणून जोखीमांपासून सुरक्षित ठेव म्हणून आरबीआय मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरची स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने ही खरेदी केली आहे. अमेरिकन डॉलरची अस्थिरता आणि पाश्चात्य अर्थव्यवस्थांच्या दबावामुळे जगभरातील अनेक केंद्रीय बँका त्यांच्या साठ्यातील सोन्याचा वाटा वाढवत आहेत. भारतही या दिशेने वाटचाल करत आहे, जेणेकरून आपला साठा मजबूत आणि संतुलित होईल.
2021-22 RBI ने 66 टन सोन्याची खरेदी केली होती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे आतापर्यंतची सर्वाधिक सोन्याची खरेदी 2021-22 या आर्थिक वर्षात केली गेली, जेव्हा एकूण 66 टन सोन्याचा साठ्यात समावेश करण्यात आला. यानंतर 2022-23 मध्ये 35 टन आणि 2023-24 मध्ये 27 टन सोन्याची खरेदी झाली. 2024-25 या आर्थिक वर्षातही सोने खरेदीने वेग घेतला आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता आणि डॉलरची अस्थिरता हे या ट्रेंडमागील प्रमुख कारण मानले जात आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा निवड झाल्यानंतर, डॉलरमध्ये सतत चढ-उतार दिसून आले, त्यामुळे सुरक्षित पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा वाढला आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात विविधता आणण्यासाठी आणि जागतिक धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आरबीआयची ही रणनीती महत्त्वाची मानली जाते.
आरबीआयच्या सोने खरेदीच्या या धोरणामुळे आर्थिक स्थैर्य
आरबीआयच्या सोने खरेदीच्या या धोरणामुळे आर्थिक स्थैर्य तर वाढेलच शिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परदेशी कर्जाचा धोकाही कमी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, जागतिक स्तरावर भारतीय रुपया मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे. एकूणच, आरबीआयने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणे हा भारताच्या दीर्घकालीन आर्थिक धोरणाचा एक भाग मानला जाऊ शकतो, ज्याचा उद्देश जागतिक आर्थिक अस्थिरतेपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे रक्षण करणे आणि परकीय चलनाचा साठा संतुलित ठेवणे हा आहे.
महत्वाच्या बातम्या:























