Pahalgam Terror Attack: दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं तुम्हाला इतकं लगेच कसं समजलं?; सिंधूचे पाणी अडवायला 20 वर्षे लागतील- शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati On Pahalgam Terror Attack: सिंधू करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाष्य केलं आहे.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशातील लोकांमध्ये संताप आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव गेला. याचदरम्यान, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनीही मोठं वक्तव्य करून या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सिंधू करार रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाष्य केलं आहे.
पाकिस्तानला आपण धडा शिकवू...पण पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, तुम्हाला कसे समजले? हे तुम्हाला इतक्या लवकर कसे कळले?, घटनेपूर्वी हे का कळले नाही? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली आहे. आपल्या घरात एखादी घटना घडल्यास आपण सगळ्यात आधी कोणाला धरणार? सर्वात आधी तर चौकीदाराला पकडणार ना? त्याला विचारणार तू कुठे होतास? तू असताना ही घटना घडली कशी? तुला कशासाठी ठेवलंय? पण इथे तसं होताना दिसत नाही. इथे स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. पण चौकीदारी नीट केली असती, असा हल्लाबोलही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.
तुमच्याकडे पाणी रोखण्यासाठी काही व्यवस्था आहे का?
सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, तुम्ही म्हणत आहात की आम्ही सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पण तुमच्याकडे पाणी रोखण्यासाठी काही व्यवस्था आहे का? आम्ही तज्ञांना विचारले की जर आपल्या देशात पाणी थांबवले तर आपल्याकडे कोणती व्यवस्था आहे? तज्ञांनी सांगितले की आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. जरी आपण आजपासून हे काम सुरू केले तरी किमान 20 वर्षे लागतील, त्यानंतर आपण सिंधू नदीचे पाणी रोखू शकू, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
VIDEO | On Pahalgam terrorist attack, Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati says, "An attack happened in Kashmir, I have heard that the government is mulling to postpone the Char Dham Yatra (in Uttarakhand), but I believe that the Yatra should resume. It is now sure… pic.twitter.com/UFN64jIoX2
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2025
प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं-
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूनं स्वत:च्या सुरक्षेसाठी सावध व्हावं असा संदेश पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं दिला आहे. गरज भासल्यास हिंदूंनी शस्त्र, शास्त्राचा अभ्यास करावा. वेळ पडल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी त्यांनी शस्त्र बाळगावीत, असंही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे.
























