Ashok Saraf : 'वख्ख्या, विख्खी, वुख्यू....', अशोक सराफ यांनी सांगितली डॉयलॉगची पडद्यामागची कहाणी
Ashok Saraf : 'वख्ख्या, विख्खी, वुख्यू....', अशोक सराफ यांनी सांगितली डॉयलॉगची पडद्यामागची कहाणी

Ashok Saraf : "धुम धडाका" हा 1985 साली प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हलक्याफुलक्या विनोदी कथानकामुळे आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे "धुम धडाका" हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला.
चित्रपटाची कथा एका श्रीमंत आजीबाईंभोवती फिरते, ज्या आपल्या नातीचं लग्न लावण्यासाठी योग्य वर शोधत असतात. त्यासाठी तीन तरुणांची निवड होते – अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे. प्रत्येकजण आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना जे गमतीदार प्रसंग घडवतो, त्यामुळे संपूर्ण चित्रपट हास्यविनोदी बनतो. प्रत्येक पात्राची वेगळी शैली, निरागसता आणि रंगतदार संवाद यामुळे प्रेक्षक सतत हसत राहतात.
दरम्यान, या सिनेमातील 'वख्ख्या, विख्खी, वुख्यू' हा अशोक सराफ हा डायलॉग प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन बसलाय. या डॉयलॉगबाबत आता अशोक सराफ यांनी भाष्य केलंय. अशोक सराफ एका मुलाखतीत बोलताना म्हणाले, व्याख्या, विख्खी, वुख्खू हा डायलॉग इतका प्रसिद्ध होईल, असे वाटले देखील नव्हते. त्यावेळी माझ्याकडून चुकून झालेली अॅक्शन होती. ती आम्ही कन्टिन्यू केली. व्याख्या, विख्खी, वुख्खू कुठून निघतं? हे स्क्रीप्टमध्ये लिहिलेलं नव्हतं. ते माझं मीच बोललो होतो. जेव्हा धनाजीराव वेष बदलून येतो. मुलाचा बाप बनून येतो तेव्हा तो गेटअप बदलला आणि त्याच्या हातात पाइप दिला. पाइपमधला तंबाखू ओढणे खूप कठीण असतो. तो घश्याला लागतो. समोर शरद तळवळकर उभे होते. मी तोंडात पाइप पकडून काय वाकडोजी धने असा डायलॉग बोलतो. त्यांचं नाव मी कधीच सरळ घेतलं नाही. धणोजी वाकडे काय वाटेल ते नाव घ्यायचो. मी बोललो माळी बुवा आणि तंबाखू घशाला बसला. तेव्हाच माझ्या तोंडून व्याख्या असं शब्द बाहेर पडला. मग तिथे कट म्हटलं. पण त्यावेळी डोक्यात आलं की हेच कन्टिन्यू केलं तर मग मी ते डायलॉग बोललो.
"धुम धडाका"चे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधी, सरळ आणि तरीही प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी कथा. संवाद, प्रसंग रचना आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ आपल्याला एक सुंदर अनुभव देतो. या चित्रपटात कोणतंही मोठं सामाजिक भाष्य नाही, तरीही तो हसवत-हसवत एका सुंदर भावनेला स्पर्श करतो – माणसांमधील निरागसतेचा आणि प्रेमाचा. आजही, इतक्या वर्षांनंतर "धुम धडाका" हा चित्रपट पाहताना ताजेपणा जाणवतो. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत हास्यपटांची नवी परंपरा सुरू केली आणि पुढे अनेक चित्रपटांना प्रेरणा दिली.एकूणच, "धुम धडाका" हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो मराठी प्रेक्षकांसाठी एक सुंदर आठवण आहे – जी प्रत्येक पिढीत ताजीतवानी राहते. हसून हसून रडवणारा हा चित्रपट आजही तेवढ्याच आनंदाने पाहिला जातो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मी रान डुक्कर खाल्लय, पिसई, घोरपड आणि ससाही खाल्लाय; अभिनेत्री छाया कदमचं वक्तव्य चर्चेत























