नॉन स्टॉप राजधानी एक्सप्रेस

चेन्नई इथे झालेल्या दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा राजधानी एक्सप्रेस सुसाट धावली...
नाणेफकीचा कौल दिल्ली संघाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली...सलामीला आलेला फ्रेसर पहिल्याच षटकात खलील च्या गोलंदाजीवर बाद झाला...त्याची जागा घेणाऱ्या अभिषेक पोरेल याने मुकेश चौधरीच्या षटकात १९ धावा चोपून काढल्या..त्यात त्याने मारलेल्या एक पुल च्या षटकारांचा समावेश होता..अभिषेक पोरेल ने २० चेंडूत ३३ धावांची खेळी केली जडेजाच्या गोलंदाजीवर तो लेट कट चा फटका खेळताना बाद झाला.. चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षर ने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने मने जिंकली..अक्षर सातत्याने भारतीय संघात सुद्धा फलंदाजीत सातत्य दाखवित आहे..त्याची खेळी छोटी होती पण अश्विन ला मारलेला एक देखणा कव्हर ड्राईव्ह आणि नूर ला मारलेली एक अप्रतिम लेटकट आनंद देऊन गेली..नंतर येणाऱ्या स्टब, रिझवी यांनी छोट्या पण उपयुक्त खेळ्या केल्या...
दिल्ली संघाचा डाव सजविला तो राहुल ने..७७ धावांच्या खेळीत त्याने नयनरम्य फटके मारले...त्याने स्लॉग स्वीप मारले...त्याने देखणे ड्राईव्ह मारले..त्याने आज मुकेश चौधरी ला एक रिव्हर्स स्विफ्ट चा चौकार देखील मारला...आपली खेळी त्याने ३ नजाकतीने मारलेल्या षटकारांनी सजवली...
चेन्नई संघाकडून आज देखील खलील ने उत्तम गोलंदाजी केली..२५ धावत २ बळी घेऊन त्याने दिल्ली संघाच्या धावसंख्येला थोडी वेसण घातली..दिल्ली संघाची धावसंख्या १८३ एवढी झाली...
१८४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई संघाला आवश्यक होती ती दमदार सुरुवात आणि आश्वासक पावर प्ले...पण या दोन्ही आघाड्यांवर चेन्नई संघ अपयशी ठरला..४६ धावा आणि ३ बळी अशी अवस्था झाल्यावर पुढचा प्रवास अवघड असणार हे नक्की झाले...दिल्ली संघाने या सहा षटकात उत्तम गोलंदाजी केली .. वीप्राज स्टार्क आणि मुकेश कुमार यांनी एक एक बळी मिळवत पहिली सहा षटके दिल्ली संघाच्या बाजूने केली..
चेन्नई संघाकडून विजय शंकर ने प्रतिकार केला त्याने आपल्याला मिळालेला जीवदानाचा फायदा घेत ६९ धावा केल्या पण आवश्यक धावगती खूप वर गेली होती...
चेन्नई संघाकडून धोनी ११ व्या षटकात फलंदाजी साठी आला..तेव्हा चेन्नई संघाला १०८ धावा ५४ चेंडूत हव्या होत्या..जेव्हा धोनी नाबाद राहिला तेव्हा २६ चेंडूत ३० धावा होत्या..
केवळ यष्टी रक्षणासाठी धोनी मैदानात आहे का? की चेन्नई संघ आणि व्यवस्थापन चेन्नई च्या विजयापेक्षा धोनी चे व्यक्ती महात्म्य जपत आहे...? धोनी आता पूर्वीचा फिनिशर राहिला नाही....तो यष्टी रक्षणात अजून ही तरुण असेल पण फलंदाजीत नाही हे सत्य आहे..डेव्हिड कॉन्वे याला यष्टी रक्षणाची जबाबदारी देऊन दीपक हुडा खेळू शकतो...
न्यूझीलंड विरुद्ध ८५ चेंडूत शतक झळकावून सुनील गावसकर निवृत्त झाले..तुम्ही निवृत्त का होत नाहीत यापेक्षा तुम्ही का निवृत्त होत आहात असे विचारत असताना आपण निवृत्ती घ्यावी..असे तेव्हा ते म्हणाले होते...
आपण कुठे थांबावे हे प्रत्येक यशस्वी माणसाला समजत असते...आणि धोनी यशस्वी सुद्धा आहे आणि परिपक्व सुद्धा..

























