BLOG | आजकालच्या तरुणाईचं 'इन्स्टा लाईफ'
आजकालची तरुणाई वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते. त्यांच्या मते इन्स्टाग्राम हे यंगस्टरांचं माध्यम आहे. त्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-लहान गोष्ट व्यक्त करण्याकडे त्यांचा कल असतो.
आपण अनेक ठिकाणी सोशल मिडियाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व वाचतो, पाहतो आणि अनुभवतो देखील. लॉकडाऊन नंतर तर सोशल मिडिया हे केवळ टाइमपासचे माध्यम राहिले नसून ती गरज बनलीय. पूर्वी तरुणाई पर्यंत सीमित असलेलं हे सोशल मीडियाचं भूत आता तेवढ्याच प्रमाणात इतर वयोगटांमध्येही आवडीचं ठरतयं. मोबाईलवर सध्या अशी अनेक सामाज माध्यमं उपलब्ध असूनसुद्धा काही विशिष्ट माध्यमांना आपल्या सर्वांचीच खास पसंती असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप ही त्यापैकीच काही माध्यमं.
यामध्ये प्रामुख्याने तरुणाईकडून जास्त वापर होणारं माध्यम म्हणजे इन्स्टाग्राम.. या मागचं कारण या युवा पिढीला विचारलं असता 'आम्हाला ते जास्त यंग वाटतं; फेसबुक जुनं झालं ओS..आता तिथं म्हातारे जास्त असतात' असं काहीसं उत्तर ऐकायला मिळतं. या स्वतःला तरुण म्हणणाऱ्या मंडळींकडून अजून एका गोष्टीचा खुलासा होतो, तो म्हणजे आजकालचं 'इन्स्टा लाईफ'.
आता 'इन्स्टा लाईफ' म्हणजे नक्की काय असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच.. हे 'इंस्टा लाईफ' म्हणजे इन्स्टंट फूड वैगरे मिळतातं त्या प्रकारातलं नाही बर का.. तर हे इन्स्टा लाईफ म्हणजे आपण इन्स्टाग्रामवर आपलं आयुष्य कसं चालू आहे, आपला आजचा दिवस कसा होता हे एका विशिष्ट प्रकारे जगासमोर मांडणं.. इंस्टा स्टोरी, फीड, IGTV, रिल्स अश्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करुन ही मंडळी इन्स्टा लाईफ मेन्टेन करत असतात.
आता तरुणाईच्या मते त्यांचं आयुष्य खरंच तसं असतं असही नाही. या इन्स्टा लाईफ मध्ये मी आज इकडे फिरलो, या हॉटेल मध्ये जेवलो, मी एकटा कसा खुश आहे किंवा माझा मित्र परिवार किती गमतीदार आहे... यापासून, माझी आई किती उत्तम जेवण बनवते, माझं काम किती कंटाळवाणं आहे.. पर्यंतचे सगळे अपडेट्स ही मंडळी शेयर करत असतात.
वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकलेल्या बातम्यांमुळे यातूनच चोरी, सायबर क्राईम, हॅकिंग सारखे प्रकार घडतात असे सल्ले त्यांना दिले असता 'आम्हांला तेवढं कळतं ओS, आम्ही दिवसभर सगळं साचवून घरी आल्यावर आरामात शेअर करत असतो, अन मुळात ते सगळंच खरं असतचं असंही नाही' अशी उत्तर मिळतातं.
या सगळ्याचा आपण जुनाट पद्धतीने विचार केला तर ही पिढी आपल्याला चुकीची वाटणार हे नक्की.. पण थोडं त्यांच्या जागेवर येऊन विचार करायचा झाला तर ही तरुण पिढी हे सगळं जाणते अन विचार करुनच ही माध्यमं वापरते असं बोलणं वावगं ठरणार नाही. या माध्यमातून आपली फसवणूक कशी होऊ शकते किंवा ही माध्यमं वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी या सगळ्याचा अभ्यास या मंडळींचा असतोच.. अर्थातच अपवाद सगळ्यालाचं असतात.
आता ऑनलाइन फ्रॉड, स्कॅममध्ये फसलेल्या व्यक्तींचं वय पाहता ती लोकं या तरुण पिढीमध्ये नक्कीचं मोडत नाहीत. त्यामुळे आपणही या तरुणांचं इंस्टा लाईफ पाहून त्यांना ओरडणं किंवा नावं ठेवणं बाजूला ठेवलं तर त्यातील त्यांच्या कलाकृतीचं कौतुक करण्यात काहीच हरकत नाही.
या इंस्टा लाईफ मुळे तरुणाई मध्ये डिप्रेशन वाढलंय, इतर तरुण मंडळीचं मानसिक आरोग्य त्यांना पाहून खचतं वैगरे या कन्सेप्ट योग्य जरी असल्या तरी त्यामुळे बाकीच्यांनी असं सोशल मीडियावर एक्सप्रेस होणं चुकीचं आहे हे मत बदलण्याची गरज आहे.
'सोसल तेवढाच सोशल मीडिया वापरावा' ही म्हण ही तरुण पिढी जाणते, हे त्यांच्याशी याविषयी संवाद केल्यावरच समजू शकतं. त्यामुळे आपण प्रयन्त करुया, या पिढीशी संवाद वाढवूया.. ओरडण्याचा मार्ग थोडा बाजूला ठेवून त्यांना समजून घेऊयात.....