ब्लॉग : तुमच्यासाठी तंत्रज्ञान, तंत्रज्ञानासाठी तुम्ही नाही....
आज तुमचा मोबाईल फोन हा तुमचा असिस्टिंग डिव्हाईस उरलेला नाही. तो तुमचा रिंगमास्टर झालाय. तो मेसेजसाठी वाजला, की गेलात तुम्ही त्याच्या स्क्रीनकडे. तो फोनसाठी वाजला की, तासनतास बोलणं सुरु. अन्य सोशल मीडिया आहेच, भर घालायला. दोष सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा, त्या तंत्रज्ञानाचा नाही, दोष आपला आहे. आपण पूर्णपणे त्याच्या आहारी गेलोय. स्वीकारा अगर नका स्वीकारु, आपण मोबाईलप्रेमी नाही, मोबाईल व्यसनी झालोय.
न्यूजचॅनेलमध्ये काम करत असल्याने हल्ली जवळपास रोज एक अशी बातमी हल्ली येऊन थडकते, जी तुमच्या जीवनशैलीत डोकावून पाहायला भाग पाडते. मग कधी ती मुंबईकरांना आवश्यक असलेल्या मानसोपचाराची असते, तर कधी तणावाने होणाऱ्या दुर्घटनांची.
आज अशीच एक बातमी आली, मोबाईलच्या अतिवापराने ब्रेन कॅन्सरचा धोका. मेंदूला झिणझिण्या आल्या पुन्हा एकदा. आज अन्न, वस्त्र, निवारासोबत मोबाईल हीदेखील मूलभूत गरज झाली आहे. किंबहुना तो आपला अवयवच झालाय म्हणा ना. आज तंत्रज्ञान जितकं विकसित होतंय, तितकं जग जवळ येतं आहे. ही बाब चांगलीच आहे. त्याच वेळी या विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग प्रगतीसाठी व्हावा, हे तंत्रज्ञान तुमच्या आयुष्याचा ताबा घेणारं असू नये. आज नेमकं तेच झालं आहे. मान्य करा अगर करु नका, पण या तंत्रज्ञानाने तुमच्याआमच्या जीवनाचा ताबा घेतला आहे. मग ते मोबाईलवर बोलणं, असो, सोशल मीडियाचे कमेंट्स असो, तिकडे फोटो पोस्ट करणं असो, त्याला लाईक-डिसलाईक करणं असो....सगळीकडे आपण त्याच्या आधीन होत चाललो आहोत.
आज तुमचा मोबाईल फोन हा तुमचा असिस्टिंग डिव्हाईस उरलेला नाही. तो तुमचा रिंगमास्टर झालाय. तो मेसेजसाठी वाजला, की गेलात तुम्ही त्याच्या स्क्रीनकडे. तो फोनसाठी वाजला की, तासनतास बोलणं सुरु. अन्य सोशल मीडिया आहेच, भर घालायला. दोष सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा, त्या तंत्रज्ञानाचा नाही, दोष आपला आहे. आपण पूर्णपणे त्याच्या आहारी गेलोय. स्वीकारा अगर नका स्वीकारु, आपण मोबाईलप्रेमी नाही, मोबाईल व्यसनी झालोय.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कॅन्सरची भीती : प्रा. गिरीश कुमार
जसे सिगरेट, दारुचे व्यसनी असतात, तसं आपल्याला मोबाईलचं व्यसन जडलंय आणि हे आपण सर्वांनीच आधी ओळखून स्वीकारण्याची तसंच नंतर यावर पावलं उचलण्याची गरज आहे. या मोबाईलच्या रेडिएशनने ब्रेनवर तर परिणाम होतोच. शिवाय तुमच्या स्वभावात, वागण्याबोलण्यातही त्याने बदल होत असतात, असं ऑब्झर्वेशन आहे. यावर मनोविकार तज्ज्ञ अधिक प्रकाश टाकू शकतील. मध्यंतरी आलेली बातमी किंबहुना हे काही प्रमाणात प्रूव्हही करतेय.
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसोपचाराची गरज आहे, ज्यात मुंबईकरांवर सर्वात जास्त मानसोपचार करावे लागतात. आता पुन्हा एकदा मोबाईलच्या या बातमीने तीच बाब अधोरेखित केलीय. यामुळे आपल्या आरोग्यावर जर थेट परिणाम होणार असतील, तर याच्या वापरावर आपण स्वत:हून काही बंधने घालून घ्यायला हवीत. जसं की,
१) अतिशय मेडिकल इमर्जन्सी किंवा काही आपत्कालीन स्थिती असेल तरच आपण फोनवरचा संवाद हा 3 मिनिटांपेक्षा जास्त ठेवावा.
२) अनावश्यक मेसेज टाळणे, गरज नसताना स्टेटस अपडेट करत राहणे हेही टाळायला हवं. (म्हणजे फीलिंग हॅप्पी, हॅविंग डिनर विथ....अशा टाईप्सचे)
३) शक्य तितक्या वेळी हेडफोन्स लावून मोबाईलवर बोलणे (याचंही प्रमाण कंट्रोलमध्ये हवं, नाहीतर कानाला प्रॉब्लेम व्हायचा)
४) जी व्यक्ती आपल्या अँक्सेसेबल डिस्टन्सवर आहे, तिच्याशी फोनवर बोलण्यापेक्षा थेट तिच्याकडे जाऊन बोलावं.
५) डोळ्यांची काळजी घेण्याकडे विशेष लक्ष द्यावं, कारण पीसीसोबतच मोबाईलच्या छोट्या स्क्रीनकडे
आपण सातत्याने पाहत असतो, हे घातक ठरु शकतं. सो त्याची काळजी ही प्रायॉरिटी असावी.
असे काही खूप बेसिक बेसिक उपाय करावेत, असं मला वाटतं. यामध्ये काही मतमतांतरं असू शकतात.
पण, याचा विचार तरी गांभीर्याने व्हावा.
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लहान मुलांना कृपा करून मोबाईल देऊच नये. हे विधान जरा धाडसी आहे, काही आईवडील याला एग्री करतील, काही करणार नाहीत. आज आपण बघतो, बहुतेक लहान मुलं म्हणजे एक ते पाच वयोगटातली म्हणतोय मी. जी मोबाईल सुरु झाल्याशिवाय जेवत-खात नाहीत. दूध पीत नाहीत. आपण आपले श्रम कमी व्हावेत, म्हणून मुलाच्या संगोपनाची ही जबाबदारी मोबाईलवर टाकून मोकळे होतो, असं मला वाटतं.
आम्ही लहान वयात होतो, तेव्हा आम्ही असा हट्ट केला की, आमचे आईवडील दामटवून ती गोष्ट आम्हाला देत नसत किंवा त्याला एकत्रित विरोध करत असत. आजच्या आईवडिलांमध्ये ते एकमत होताना दिसत नाही, मुलगा किंवा मुलगी नाही जेवली तर आईने विरोध केला तर बाबा इमोशनल होतात. तर कधी बाबांनी स्ट्रिक्ट राहायचं ठरवलं तर आईच्या घशाखाली घास उतरत नाही. यातला इमोशनल बॉन्डिंगचा फॅक्टर जरी समजून घेतला तरी मुलांच्या कलाने घेताना, त्यांचे अवास्तव लाड होतायत का? त्यांच्या मनासारखं करताना, त्यांच्या मनमानीपणाला चालना मिळतेय का? यासारखे प्रश्न आपण सगळ्यांनीच स्वत:ला विचारुन पाहावेत.
ही उद्याची पिढी टेक्नॉसॅव्ही आहे ती राहणारच. पण, त्यांना व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी विचार हे यंत्रांनी नव्हे तर माणसांनी द्यायला हवेत. कारण, एखादं यंत्र माणूस घडवत नाही तर त्या यंत्राची निर्मिती माणूस करत असतो. म्हणजेच तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. ते जीवनशैलीला पूरक असावं, जीवनशैलीवर ताबा घेणारं नाही. तेव्हा आपण सर्व वेळीच जागे होऊया.