एक्स्प्लोर

BLOG | सचिनच्या खणखणीत करिअरचा फ्लॅशबॅक...पत्रातून..

आज मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार नसल्याचं त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रिय सचिन,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोरोनाच्या संकट काळामुळे तू यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीस, हे कळलं. तुझ्यातलं हेच संवेदनशील मन वेळोवेळी दिसलंय. तुझा ऑफ द फिल्ड वावरही आदर्शच होता, म्हणून तू मनामनात मानाचं स्थान मिळवून आहेस. या कोरोना काळामुळे मीही असाच फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तुझ्या खणखणीत करिअरमध्ये डोकवायचा प्रयत्न करतोय.

खरं तर तू फटाक्यांच्या माळेप्रमाणे यादगार इनिंगची माळच लावलीस. शतकाधीश झालास. विक्रमांचे एकेक टॉवर खुजे केलेस, काही नव्याने रचलेस तर काहींची सद्दी मोडून तिथे स्वत:ची नेमप्लेट लावलीस.

तुझं सातत्य पाहून एका लेखात त्यावेळी मी वाचलेलं एक वाक्य मनावर आजही कोरलं गेलंय, 'ओन्ली वन प्लेअर कॅन प्ले बेटर दॅन सचिन तेंडुलकर, ही हिमसेल्फ.'

तुझ्या काही इनिंग खासच आहेत, म्हणजे तू अब्दुल कादीर, वकारसारख्या त्या काळच्या इन फॉर्म गोलंदाजांसमोर पाकिस्तानात केलेलं पदार्पण.

त्यात वकारच्या वेगवान चेंडूने रक्तबंबाळ झालेला तू परत उठून म्हणाला होतास, मै खेलेगा..

तिथेच तुझ्या मोठेपणाची पहिली वीट रचली गेल्याचं जाणकार सांगतात.

मग नागासारखा फणा काढत उसळणाऱ्या पर्थच्या खेळपट्टीवर ज्या धीरोदात्तपणे मिशाळ मर्व्ह ह्यूज, मॅकडरमॉट, रीड यासारख्या कांगारुंच्या तोफखान्याला तू तोंड दिलं होतंस, तेही लाजवाब.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह तू जगभरात धावा कुटल्यास.

माझ्यासाठी तुझ्या शारजातील कांगारुविरुद्ध केलेल्या दोन इनिंग्ज खूप मनाजवळ आहेत, त्या आजही लख्ख आठवतात तारखेसकट, २२ आणि २४ एप्रिल १९९८. एक खेळी जिने भारताला त्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून दिली, तर दुसरीने ट्रॉफीचा मान पटकवून दिला. शारजातलं वादळच होतं ते. ऑसी टीमचा पालापाचोळा करणारं.

कॅस्प्रोविच, डॅमिएन फ्लेमिंग, मूडी यांना तू छतावर भिरकावत होतास, लीलया. शेन वॉर्नलाही आरामात खेळलेलास. तेव्हा तुझ्या आतषबाजी टोनी ग्रेग यांच्या एनर्जिटिक कॉमेंट्रीमुळे प्रेक्षणीय आणि श्रवणीयही वाटत होती.

मी हे लिहित असताना अशा अनेक संस्मरणीय इनिंग्जचं मोरपिस एव्हाना लोकांच्या मनावर फिरलं असेल. तू स्टेप आऊट होऊन साकलेन, मॅग्राला, शेन वॉर्नला भिरकावलेलं आजही लक्षात आहे, तसंच कॅडिकला तू एका वर्ल्डकपमध्ये ग्राऊंडबाहेर मारलेला षटकार, आजही अंगावर रोमांच उभे करतो.

तसाच २००३ च्या वर्ल्डकपला तू थर्डमॅनवरुन शोएब अख्तरला स्टँडमध्ये पाठवलं होतंस. तो षटकार आठवला की, आजही धडधड वाढते.

तुझ्यानंतर धोनी, युवराज, सेहवाग, कोहली, रोहित यांनी आम्हाला अशा फटकेबाजीची सवय लावली असली तरी त्या माळेतलं पहिलं फूल तू गुंफलं आहेस. ज्याचा दरवळ तू निवृत्त झालास तरी, आमच्या मनात कायम आहे आणि राहणार.

तुझ्या डोकेबाज गोलंदाजीनेही तू अनेक सामने जिंकून दिले आहेस. लेग स्पिन, ऑफ स्पिनच्या भन्नाट मिश्रणाने, मध्येच मध्यमगती मारा करत तू फलंदाजांना चक्रावून टाकायचास.

ती १९९३ ची हिरो कप सेमी फायनल आठवली की, आजही अंगावर काटा येतो. दक्षिण आफ्रिकेला जिंकायला सहा बॉल सहा रन्स, समोर ब्रायन मॅकमिलन, नावाचा जायंट फलंदाज. तेव्हा तू चेंडू हातात घेतलास. त्या लास्ट ओव्हरच्या प्रत्येक चेंडूवर माझ्यासकट कित्येकांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील आणि ब्लडप्रेशरचा काऊंट किती वरखाली झाला असेल ते देवच जाणे. तू ती मॅच जिंकून दिलीस.

तुझं रनिंग बिटविन द विकेटही केवळ अफलातून. धावांच्या इतक्या राशी घालताना तू कधी रनर घेऊन खेळल्याचं आठवत नाही, तुझा स्टॅमिना. फिटनेस भन्नाटच म्हणावा लागेल. म्हणजे तुलाही टेनिस एल्बोसारख्या दुखापतींनी गाठलं, तरीही तुझ्या मेहनतीने, जिद्दीने तू त्यातून बाहेर आलास.

तुझं क्षेत्ररक्षणही तितकंच दक्ष असायचं. तुझे बाऊंड्रीवरुन आलेले रॉकेट थ्रोही तितकेच सॉलिड.

थोडीथोडकी नव्हे 24 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलास. जंटलमन्स गेम हे क्रिकेटचं वर्णन शब्दश: सार्थ ठरवतानाच त्याची शान तू उंचावलीस.

कारकीर्दीतील तुझ्या अखेरच्या सामन्यावेळी वानखेडेवर तू व्यक्त केलेलं मनोगत आजही डोळ्यांच्या कडा ओल्या करतं. तुझ्या करिअरमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानत होतास. त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनबद्दल भरभरून बोलत होतास. गुणवत्तेला मेहनतीची जोड लाभली अन् त्याला विनम्रतेचं कोंदण असलं की, ते यश टाळ्या वाजवायला तर लावतंच, पण समोरच्याला नतमस्तकही व्हायला लावतं. तसं तुझ्याबाबतीत आमच्यासारख्या चाहत्यांचं आहे. माझं तर म्हणणं आहे की, तुझं ते मनोगत एखाद्या अभ्यासक्रमाचा भाग व्हावा.

त्या सामन्यात तू जेव्हा पिचला हात लावून नमस्कार केलास ना तेव्हा वानखेडेवरचं गवतही शहारलं असणार.

द्वारकानाथ संझगिरी सरांचं त्यावेळच्या लेखातलं वाक्य आजही डोळे पाणावतं. त्यांनी लिहिलं होतं, आज वानखेडेवरचं गवत ओलं झालं होतं, चुकूनही समजू नका, दव पडलं होतं, ते गवताचे अश्रू होते.

तू आम्हाला आनंद नुसता दिला नाहीस तर तो भरभरून वाटलास. तोच सुखावणारा काळ पुन्हा या कोरोनाच्या संकट काळात तुझ्या या करिअरकडे पाहत जगण्याचा प्रयत्न करतोय रे.

तुझ्यात आम्ही आमचा माणूस बघायचो, अजूनही बघतो. तू आऊट झालास की, चिडचिड व्हायची. तू शतक ठोकलंस की, आमचीच सेंच्युरी लागल्यागत आनंदाने छाती ताठ करुन फिरायचो आम्ही. तुझं यश आमचं वाटायचं आणि तुझं अपयश मनाला असंख्य वेदना द्यायचं. कारण तू आमचा फॅमिली मेंबरच होतास, नव्हे आजही आहेस. तुझ्या खेळातली आक्रमकता अन् त्याच वेळी तुझ्या वागण्याबोलण्यातली मृदूता, याला सलाम आहे.

तुझ्या घरी जायचा एकदा योग आला होता, तेव्हा तुझ्या दारावरची पाटीही बरीच बोलकी होती, 'सचिन तेंडुलकर' असं न लिहिता तू 'तेंडुलकर्स' असं लिहिलं होतंस. तुझं टीम स्पिरीट किती घट्ट आहे हेच दाखवणारी ही पाटी.

तुझे आईवडील,तुझे आचरेकर सर यांच्यासोबत तुला साथ देणारे तुझे कुटुंबीय, मित्रपरिवार साऱ्यांनाच वंदन आहे.

आभाळ कवेत घेऊनही पाय जमिनीवरच राहणं म्हणजे काय असतं, याचा वस्तुपाठ तू घालून दिलायस. तू सतत लढत राहिलास आणि जिंकतही. तुझं हेच स्पिरीट आज कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी बाळगायला हवं, अन् रक्तबंबाळ झाल्यानंतरही जशी तू ती सुरुवातीच्या काळातली इनिंग खेळलास, लढलास आणि जिंकलास. तसंच तू म्हटल्याप्रमाणे सर्वांनीच आयुष्याच्या या पिचवर धास्तावून न जाता म्हणायला हवं, मै खेलेगा और कोरोनाको हराएगा.

सचिन. वाढदिवसाच्या अन् उत्तम आरोग्याच्या मनापासून शुभेच्छा.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Embed widget