वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकाला फायदा : राजू शेट्टी
अर्थसंकल्पात शेतीपंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याच्या निर्णय घेतलाय. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) स्वागत केलं आहे.
Raju Shetti on Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget) राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या 7.5 एच. पी. आतील शेतीपंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याच्या निर्णय घेतलाय. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) स्वागत केलं आहे. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील गरजेची होती. तो निर्णय घेतला असता तर शेतकरी राज्य सरकारच्या पाठीशी राहिला असता असेही राजू शेट्टी म्हणाले.
दुधाला 5 रुपयाचे अनुदान देखील स्वागतार्ह
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना वीज माफी मिळावी यासाठी सातत्याने आंदोलने करण्यात आलेली आहेत. तसेच कोल्हापूर येथे 15 दिवस ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले होते. वन्यप्राण्यांच्या बाबतीत देखील स्वाभिमानीच्या वतीने आंदोलने करण्यात आलेली आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत 5 लाख रूपयांची वाढ केली आहे. याचेही आम्ही स्वागत करतो. दुधाला दुधाला 7 रूपये प्रतिलिटर अनुदान देण्याची आम्ही मागणी केली होती. तरीही सरकारने जाहीर केलेली 5 रुपयाचे अनुदान देखील स्वागतार्ह असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरज
दुधामध्ये होणाऱ्या भेसळीवर तातडीने पावले उचलण्याची गरजेचे आहे. तसेच महायुती सरकारवर राज्यातील शेतकरी नाराज आहेत. सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यासाठी त्यांना कर्जमाफी देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यास याचा फायदा राज्य सरकारला विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितच होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
दूध पावडर आयात करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा
केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रूपयेचे दिलेले अनुदान देखील उपयोगी ठरणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले. राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणून सदर निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे असेही शेट्टी म्हणाले.
44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार
अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील 44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: