Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?
Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे शरद पवारांचे (Sharad Pawar) मानसपुत्र मानले जातात. दिलीप वळसे सलग सात वेळा आंबेगाव मतदारसंघातून आमदार झाले आहेत, प्रत्येकवेळी त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार होते. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसेंच्या (Dilip Walse Patil) विरोधात उभे ठाकलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंबेगावात सभा घेतली आणि ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. त्यानंतर आता या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. अशातच एबीपी माझाशी संवाद साधताना शरद पवारांबाबत (Sharad Pawar) बोलताना दिलीप वळसे पाटील भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते, असं म्हटलं त्याबाबत एबीपी माझाशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'मी स्वत: कधीही म्हटलं नाही की, मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोक तसं म्हणायचे. सार्वजनिक समारंभामध्ये कुटुंबं एकत्र आली, म्हणजे कौटुंबीक संबंध होते असं होतं नाही. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा वहिनी भिमाशंकरला दर्शनाला आल्या की आमच्या घरी यायच्या. मी ग्रॅज्यूएट झाल्यावर पंचवीस वर्षांचा असताना शरद पवारांचा पी.ए म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चाळीस वर्षे घरामध्ये जाणं येणं होतं. जर शरद पवार म्हणत असतील तर कौटुंबीक संबंध नसतील, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे....
शरद पवार आणि माझे वडील एकाच वेळी 1967 ला आमदार झाले. शरद पवार म्हणाले की, त्यावेळी माझे वडील त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले होते. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मिसेस पवार, मिसेस शिंदे, आमच्या घरी आल्या . तेव्हापासुन येणं सुरु होतं. माझ्या मुलीचे सुप्रिया सुळेंसोबत कौटुंबीक संबंध नव्हते. राजकीय संबंध होते. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या एकत्र काम करत होत्या, असंही ते यावेळी उपहासाने म्हणालेत. शरद पवारांनी कौटुंबीक संबंध नव्हते असं म्हटल्याने वेदना झाल्या, जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे ये-जा करत असेल. तर त्याला कसले संबंध म्हणायचं हे लोकांनी ठरवायचं आहे, असंही यावेळी वळसे पाटील म्हणालेत. यावेळी बोलताना वळसे पाटील भावून झाल्याचं दिसून आले.