निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातील भाजपचे जवळपास 90 हजार लोक आले असून त्यांच्या येण्यानं महाराष्ट्रातील ऑक्सिजन कमी झाल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
अहमदनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसने स्टार प्रचारांची टीम महाराष्ट्रात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज भाजप नेते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक नेते प्रचारदौरे करत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर भाजपने यंदाच्या निवडणुकीत मायक्रो प्लॅनिंग केलं असून तब्बल 90 हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्रात आल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पाथर्डी येथील सभेतून बोलताना सांगितले. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे, केंद्रातील भाजप नेत्यांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी, जाहिरातबाजी आणि मोठी प्रचारयंत्रणा व बुथ यंत्रणा राबवली आहे. पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) वक्तव्यावरुन ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातील भाजपचे जवळपास 90 हजार लोक आले असून त्यांच्या येण्यानं महाराष्ट्रातील ऑक्सिजन कमी झाल्याचे मिश्कील टिप्पणी पंकजा मुंडे यांनी पाथर्डी येथील जाहीर सभेत बोलताना केली. पंकजा यांनी हसत-खेळत हे सांगितलं असलं तरीही भाजपचे अतिशय बारकाईने कामकाज सुरू असल्याचं देखील यावरून स्पष्ट होतं आहे. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक बुथवर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातून भाजपचे पदाधिकारी आणि नेते आले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, या निवडणुकीसाठी भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे पाहायला मिळत आहे.
ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्षपद
पंकजा मुंडे सध्या राज्यातील भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी भाषणात ऊसतोड मजुरांना वीस तारखेनंतर ऊस तोडणीसाठी जाण्याचं आवाहन केलं. यावेळी खालून भाव वाढ- भाव वाढ अशा प्रतिक्रिया आल्यानंतर ऊस तोडणीसाठी मिळणारी मजुरी वाढवून मिळण्यासाठी ऊसतोड मजूर महामंडळाच्या अध्यक्षपदाची आपण मागणी करत आहोत. मात्र, अद्याप मिळालेल नाही, यावेळी देखील मागणी करणार असून मिळाल्यास दोन वर्षात हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
जीव मुठीत धरुन मी हेलिकॉप्टरने आले
मोनिका राजळीनी त्यांच्या भाषणात केलेला विकास सांगितला, शेवगाव पाथर्डी साठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. ही माझ्या भगवान बाबांची भगवान गडाची भूमी आहे, या पाथर्डीचे मोठे भाग्य एका बाजूने वामन भाऊ तर एका बाजूने भगवान बाबा, तर एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आशीर्वाद आहे. ज्यांचं कोणी वाली नाही, त्यांच्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले, ज्यावेळी या अहिल्यानगरमध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं, मला गडावरून पंकजा दिसते, अशी आठवण पंकजा मुंडेंनी येथील सभेत सांगितली. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता लोकांचं काम करायचं हे माझ्या वडिलांनी सांगितलं. परळीपेक्षा पाथर्डीने माझं जास्त ऐकलं, माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका राजळे यांना निवडून दिलं. मी सभांची यादी केली तेव्हा मोनिका यांना म्हटलं, भाजपकडून यंदा हेलिकॉप्टर नाही तेव्हा काय करावं. मी हे जे उडतंय (ड्रोन कडे पाहत ) अशा हेलिकॉप्टरमध्ये बसून आले, मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन मी आले, डबल इंजिनचे हेलिकॉप्टर राजनाथ सिंह यांच्या सभेला गेले. मी म्हणाले, स्कुटरला इंजिन बांधून द्या पण मला सभेला जाऊद्या, असे म्हणत येथील सभेसाठी आपण मोठे कष्ट घेतल्याचं पंकजा यांनी म्हटलं.
हेही वाचा
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट