Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
हा देश आपला आहे, सतर्क राहून जागृत व्हा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, इतके आमदार निवडून द्या की पुन्हा कोण सरकार चोरणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Priyanka Gandhi In Kohapur : निवडणूक आली की जाती आणि धर्माच्या नावावर राजकारण करतात, राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल बोलले, अशी टीका करण्यात आली, राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचं सांगितलं जातं. तथापि, आरक्षण तर राजीव गांधी यांनी आणलं. भ्रष्टाचारावर बोलण्याचं तुमचं धाडस कस होतं? महाराष्ट्राचं सरकार तुम्ही खरेदी केलं, तोडलं आणि मोदी तुम्ही संविधानची गोष्ट बोलता? अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. कोल्हापुरातील गांधी मैदानात प्रियांका गांधी यांची पहिल्यांदाच सभा झाली.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला
प्रियांका म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकली की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी हल्लाबोल केला.
इमानदार बनण्याची जबाबदारी फक्त जनतेची आहे का?
प्रियांका म्हणाल्या की, महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही. इमानदार बनण्याची जबाबदारी फक्त जनतेची आहे का? व्यासपीठावरून भाषण ठोकणाऱ्यांची जबाबदारी नाही का? सत्तेत बसलेल्या लोकांची जबाबदारी नाही का? सत्य एक दिवस बाहेर येईल. या राज्यात तुम्ही नवीन सरकार आणाल ही अपेक्षा आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, पण आम्ही कर्नाटकात सरकार आलेल्या महिन्यापासून गृहलक्ष्मी योजना आणली. ही महाविकास आघाडीची गॅरेंटी आहे.
इतके आमदार निवडून द्या की पुन्हा कोण सरकार चोरणार नाही
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत. जातीनिहाय जनगणना केली जाणार आणि आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 25 लाख पर्यंतची आरोग्य सेवा मोफत केली जाणार, शेतकऱ्यांचे 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ केलं जाणार, तरुणांना महिन्याला 4 हजार भत्ता दिला जाणार, तुम्ही अर्जुन बना, आपल्यासाठी काय काम केलं हे पहा. हा देश आपला आहे, सतर्क राहून जागृत व्हा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, इतके आमदार निवडून द्या की पुन्हा कोण सरकार चोरणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
तुमच्या प्रश्नांशी त्यांना काही देणं घेणं नाही
प्रियांका गांधी म्हणाल्या की, शेतकरी, दूध उत्पादक, ऊस उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न कायम आहेत. मात्र, या सगळ्यावर हे नेते उत्तर देत नाहीत. इथले उद्योग इतर राज्यात नेले जातात, उद्योगपतींच्या हातात महाराष्ट्र दिला जात आहे. उद्योगपतीचे कर्ज माफ केले जाते. रोजगार निर्मितीसाठी कोणतीही योजना यांच्याजवळ नाही. तुमच्या प्रश्नांशी त्यांना काही देणं घेणं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या