(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar : आरोप आणि तक्रारींबाबत मीडियासमोर बोलणार नाही - पूजा खेडकर
Pooja Khedkar : आरोप आणि तक्रारींबाबत मीडियासमोर बोलणार नाही - पूजा खेडकर जगातील दुसरी सर्वात अवघड आणि देशातील सर्वात अवघड परीक्षा असा नावलौकीक असणाऱ्या, सर्वाधिक पारदर्शकतेची ओळख असलेल्या यूपीएससीवर पूजा खेडकर प्रकरणानंतर काही प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत. यूपीएससीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप चालत नाही असं समजून दरवर्षी देशभरातून आठ ते दहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी काही शेकडो उमेदवार सेवेत येतात. पण पूजा खेडकरांच्या प्रकरणानंतर जी काही माहिती समोर आली आहे त्यावरून आता यूपीएससीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपल्या चमकोगिरीमुळे चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. पूजा खेडकर यांनी खोटा अपंगत्वाचा दाखला काढला, पण वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा बोलावूनही गेल्या नाहीत. शेवटी खासगी डॉक्टराकडून अहवाल घेतला आणि तो जमा केला. त्यानंतर यूपीएससीने आणि कॅटने नियुक्तीला विरोध करूनही पूजा खेडकरांना आयएएस पद बहाल करण्यात आलं. पूजा खेडकरांची संपत्ती 17 कोटींची असूनही, त्यांच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी असूनही त्यांना ओबीसी क्रिमी लेअरचा दाखला मिळाला. त्याच्या आधारे पूजा खेडकरांनी यूपीएससीची परीक्षाही दिल्याचं समोर आलं. नंतर ओबीसीमधून 9 अटेम्प्ट संपल्यानंतर त्यांनी नाव बदलून अपंग प्रवर्गातून परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्याचं समोर आलं. पूजा खेडकर प्रकरणातून यूपीएससीच्या प्रक्रियेवरही काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनात असलेले यूपीएससीबद्दलचे 10 प्रश्न आपण सविस्तर पाहूयात, 1. UPSC ने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीमध्ये केंद्रीय कार्मिक मंत्रालयाची भूमिका काय आहे? यूपीएससीने आणि त्यानंतर कॅटने शिफारस नाकारूनही पूजा खेडकरांची नियुक्ती कशी करण्यात आली? पूजा खेडकरांनी खासगी डॉक्टरकडून मिळवलेले खोटे प्रमाणपत्र कुणी ग्राह्य धरलं? UPSC मध्ये खरोखरच राजकीय हस्तक्षेप चालतो का? 2. पूजा खेडकर यांच्याप्रमाणे दिल्ली एम्समधे मेडिकल टेस्ट न करता, खासगी किंवा इतर ठिकाणाहून अपंगत्वाचा दाखला देणारे किती उमेदवार आज सेवेत दाखल आहेत? 3. UPSC मधून अपंग प्रवर्गातून परीक्षा देऊन, जे खरोखरच अपंग आहेत आणि यूपीएससी उत्तीर्ण झालेले आहेत असे अनेक उमेदवार आहेत, त्यांना नियुक्ती न देता वर्षानुवर्षे ताटकळत ठेवण्यात आलं आहे. असं असताना पूजा खेडकरांना कशी नियुक्ती दिली गेली? 4. अलिकडच्या काळात ज्यांचे पालक प्रशासनात आयएएस, आयपीएस किंवा प्रशासनात वरीष्ठ पदांवर आहेत अशा उमेदवारांची यूपीएससीमधून उत्तीर्ण होणाची संख्या कशी वाढत आहे? या अधिकाऱ्यांना यूपीएससीमधील खाचाखुणा माहिती आहेत का? खरोखरच यूपीएससीमध्ये वशिलेबाजी चालते का? 5. उमेदवार निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेचा यूपीएससीने आतापर्यंत कोणता सर्व्हे केला आहे का? उत्तीर्ण झालेले उमेदवार नंतर सेवेत गेल्यानंतर कशा पद्धतीने काम करतात, सिव्हील सर्व्हिसेसचा हेतू साध्य होतो का? 6. UPSC देशातील सर्वोच्च पदासाठी ज्या पद्धतीने निवड प्रक्रिया राबवते ती निवड प्रक्रिया खरोखरच सर्वोत्तम आहे का? तसं नसेल तर पूजा खेडकरांसारखे चमकोगिरी करणारे आणि खोटे दाखले देऊन उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस कसे होतात? 7. खासगी क्षेत्रात चांगल्या मार्गाने भरपूर पैसा मिळत असतानाही यूपीएससी सर्विस अनेकांसाठी आकर्षक का ठरते? या क्षेत्रातील ग्लॅमर आणि मिळणाऱ्या 'वरच्या' मलईमुळे लोक सर्विसमधे येतात का? 8. UPSC त्यांची गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेची अन्सर की म्हणजे उत्तरतालिका ही अंतिम निवड प्रक्रिया झाल्यावर प्रकाशित करते. MPSC जर पूर्व परीक्षा निकालाच्या आधी अन्सर की प्रकाशित करत असेल तर यूपीएससी अस का करत नाही? UPSC पूर्व परीक्षेचा निकाल जर 15 दिवसांत लागत असेल तर अन्सर की पुढच्या वर्षी का दिली जाते? यामध्ये पारदर्शकता का नाही? 9. यूपीएससीच्या मुलाखतीमध्ये उमेदवाराची नेमके कोणते गुण हेरले जातात? अनेकदा पॅनेलवाईज मुलाखती असतात. काही पॅनेलकडून मुलांना कमी मार्क्स दिले जातात तर काहींकडून अधिक मार्क्स दिले जातात अशी तक्रार असते. त्याचा निकालावर निश्चितपणे परिणाम होतो. पूजा खेडकर याना खासगी मॉक इंटरव्हियूमध्ये साध्यासाध्या प्रश्नाचीउत्तर देता आली नाहीत, त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. मग यूपीएससीमधे तिला 275 पैकी 182 मार्क्स कसे मिळाले? 10. आतापर्यंत कोणत्याही ट्रेनी अधिकाऱ्याला त्याच्या चुकीच्या वर्तनामुळे बडतर्फ करण्यात आले आहे का? खोटे कागदपत्र सादर करणाऱ्या पूजा खेडकरला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल का?