Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांना 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी निकालाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. आपल्या आरोपांनंतर मेधा सोमय्यांच्या मनाला वेदना होत असतील तर त्यांचे पती इतरांवर बिनबुडाचे आरोप करताना इतरांना वेदना होत नसतील का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. न्यायपालिका दबावाखाली काम करत असून सगळ्यांचा हिशोब चुकता केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टाने दोषी ठरवलंय. सोमय्या दाम्पत्याने मिरा भायंदर महापालिका क्षेत्रात 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने राऊतांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही ठोठावला आहे.