PBKS vs DC: पंजाबकडून जितेश शर्मा एकटाच झुंजला! शार्दुल ठाकूरचा भेदक मारा, दिल्लीचा 17 धावांनी विजय
PBKS vs DC: या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं.

PBKS vs DC: दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले. दिल्लीकडून शार्दूल ठाकूरनं (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं अतितटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला 20 षटकात 142 धावाचं करता आल्या. पंजाबकडून जितेश शर्मानं (Jitesh Sharma) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली.
दिल्लीच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबचे सलामीवीर जॉनी बेअरेस्टो आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. दिल्लीच्या संघानं तीन षटकात 30 धावांचा टप्पा ओलांडला. परंतु, पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात एनरिच नॉर्टिजेच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरेस्टो (15 चेंडू 28 धावा) बाद झाला. त्यानंतर सहाव्या षटकात शिखर धवन यानंही (16 चेंडू 19 धावा) त्याची विकेट गमावली.
या सामन्यात भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मयांक अग्रवाल या तिघांना पाच धावांचा आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर जितेश शर्मानं पंजाबच्या संघासाठी एकाकी झुंज दिली. त्यानं 34 चेंडूत 44 धावा केल्या. जितेशनं एका बाजूनं संघाचा डाव संभाळून ठेवला. परंतु, दुसऱ्या बाजूनं पाठोपाठ फलंदाज बाद झाले. ज्यामुळं पंजाबला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 142 धावा करता आल्या. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिच नॉर्टिजेच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघानं सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वार्नरच्या रुपात पहिली विकेट्स गमावली. त्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्शनं संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 51 धावांची भागेदारी झाली. परंतु, लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर सर्फराजनं विकेट्स गमावली. दिल्लीच्या संघाचे दोन विकेट्स पडल्यानंतर ललित यादव फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला.
ललीत यादवला सोबत घेऊन मिचेश मार्शनं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अर्शदीप सिंहनं ललीत यादवला आपल्या जाळ्यात अडकवून दिल्लीच्या संघाला तिसरा धक्का. दरम्यान, मिचेश मार्शनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं 48 चेंडूत 63 धावा केल्या. मिचेश मार्शबाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. दिल्लीनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावा केल्या. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंहनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडाला एक विकेट प्राप्त झाली.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
