(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: मुंबईच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमार यादवच्या जागेवर 'या' खेळाडूचा संघात समावेश
IPL 2022: पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघानं यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन केलं आहे. या हंगामात मुंबईच्या संघाला 12 सामन्यांपैकी नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.
Akash Madhwal Joins MI: पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघानं यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन केलं आहे. या हंगामात मुंबईच्या संघाला 12 सामन्यांपैकी नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. याचदरम्यान, मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. मुंबईच्या सुरूवातीच्या तीन सामन्यातही सूर्यकुमार यादव संघाबाहेर होता. त्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मुंबईच्या संघानं त्याच्या जागेवर उत्तराखंडचा युवा खेळाडू आकाश मधवालचा संघात समावेश केला आहे.
गुजरातविरुद्ध सामन्यात सूर्यकुमारला दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागलं होतं. आयपीएलनंतर भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतही सूर्यकुमार यादव खेळण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवनं दमदार कामगिरी केली. यंदाच्या हंगामात मुंबईकडून त्यानं आठ सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 43 च्या सरासरीनं आणि 146 च्या स्ट्राईक रेटनं 303 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव तिसरा खेळाडू होता. या यादीत तिलक वर्मा (368) अव्वल स्थानी आहे. तर, ईशान किशन (327) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांनी सूर्यकुमार यादव पेक्षा चार- चार सामने जास्त खेळले आहेत.
आकाश मधवालची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
आकाश मधवालला जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाही. 28 वर्षीय मधवालनं 15 टी-20 मध्ये 27 च्या सरासरीनं आणि 7.55 च्या इकॉनॉमी रेटनं 15 विकेट्स घेतल्या. 16/3 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं 6 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 विकेट्स आणि 11 लिस्ट ए सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतले आहेत. मुंबईच्या संघानं त्याला 20 लाख रुपयांमध्ये संघात सामील करून घेतलं आहे. मुंबईच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. या दोन सामन्यात आकाश मधवाल संधी मिळते का? आणि मिळालेल्या संधीचं तो कसं सोनं करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-